रासेयो स्थापना दिनानिमित्त मुलींना व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे
“आत्मविश्वास, शिक्षण आणि स्वावलंबनातून जीवनाला नवी दिशा द्या” — पोलीस उपनिरीक्षक राधिका गायकवाड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर : गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूरद्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) स्थापना दिनानिमित्त विद्यार्थिनींसाठी व्यक्तिमत्त्व विकास व मार्गदर्शन कार्यक्रम गुरुवारी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य साईनाथ मेश्राम होते. गडचांदूर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक राधिका गायकवाड यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थिनींशी संवाद साधला.
यावेळी मार्गदर्शन करताना राधिका गायकवाड यांनी मुलींना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, आत्मविश्वास वाढविणे, शिक्षणाचे महत्त्व, भावनिक व सामाजिक आकर्षणांकडे सकारात्मक आणि जबाबदारीने पाहणे, स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहणे तसेच भविष्यात करिअरच्या संधींचा शोध घेणे याबाबत मार्गदर्शन केले.
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी गरिबी ही प्रगतीच्या मार्गातील अंतिम अडथळा नाही. शिक्षण, मेहनत, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर मुली स्वतःचे आयुष्य बदलू शकतात आणि स्वावलंबी होऊ शकतात, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थिनींना दिला. तसेच नोकरी व विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव, उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदीप परसुटकर आणि प्रा. आशिष देरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदीप परसुटकर, संचालन प्रा. सुधीर थिपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन भैसारे यांनी केले. विद्यार्थिनींनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



