ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विशेष सखोल पुनरीक्षण’ मोहिमेतून पात्र मतदार वगळला जाऊ नये – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

चंद्रपूर येथे एसआयआर कार्यक्रमाचा आढावा ; मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची पाहणी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision–SIR) प्रक्रियेत कोणताही पात्र भारतीय नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, तसेच अपात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीत येऊ नये, यासाठी निवडणूक यंत्रणेने अत्यंत दक्षतेने, पारदर्शकपणे आणि भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असे निर्देश महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.

चंद्रपूर येथील वीस कलमी सभागृहात आयोजित बैठकीत चोक्कलिंगम यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या एसआयआर कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत, चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, संदीप भस्के, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघांचे संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

सुरवातीला जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय एसआयआर अंतर्गत झालेल्या कामकाजाची माहिती सादर केली. मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नावांच्या प्रकरणांची पडताळणी करताना संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक व पात्र मतदार असल्याचे स्पष्ट झाल्यास आयोगाच्या नियमानुसार त्याच्या नावाच्या समावेशासाठी आवश्यक कार्यवाही करावी. कोणताही पात्र नागरिक केवळ प्रक्रियात्मक कारणामुळे मतदार यादीबाहेर राहणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले.

नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे या दोन्ही बाबतीत प्रत्यक्ष पडताळणी, उपलब्ध पुरावे आणि आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. संशयित प्रकरणांमध्ये आवश्यक पंचनामा व पडताळणी करून निर्णय घ्यावा. दुबार नोंदणीची प्रकरणे हाताळताना संबंधित मतदाराचे नाव, छायाचित्र आणि उपलब्ध नोंदींची काळजीपूर्वक तपासणी करावी. नागरिकत्वाबाबत संशय असलेल्या प्रकरणांमध्येही नियमानुसार सखोल पडताळणी करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

युवक व नवमतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी महाविद्यालये तसेच युवकांची उपस्थिती असलेल्या विविध ठिकाणी विशेष मतदार नोंदणी शिबिरे आयोजित करावे. जिल्ह्यातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या समस्या व अडचणी जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्यात आले.

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकाऱ्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा नियमानुसार पूर्ण वापर करावा. स्थानिक स्तरावर निराकरण होऊ न शकणारे अथवा अधिकारक्षेत्राबाहेरील विषय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे तातडीने सादर करावेत. क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणी सोडविताना आयोगाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विशेष सखोल पुनरीक्षणाची संकल्पना, नियमित पुनरीक्षणाच्या तुलनेतील कार्यपद्धती, गणना प्रपत्र, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज प्रक्रिया, मतदार यादीची अचूकता, युवक मतदार नोंदणी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा आणि दुर्गम भागातील पुनरीक्षणाच्या कामकाजाबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर नवीन नोंदणी, मतदार यादीतील तपशील अद्ययावत करणे आणि अर्जाची स्थिती तपासणे यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत.

एसआयआर प्रक्रियेबाबत मतदारांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी अधिकृत माहितीचा व्यापक प्रसार करण्याची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली. मतदारांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी तसेच आवश्यकतेनुसार संबंधित बीएलओ अथवा निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधावा.

मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची पाहणी

आढावा बैठकीनंतर मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी जिल्ह्यातील मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्यासह पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सा. बां. विद्युत विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. स्थानिक राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही सुरक्षा कक्षाच्या पाहणीदरम्यान उपस्थित होते.

सुरक्षा कक्षाची भौतिक सुरक्षा, पोलीस बंदोबस्त, विद्युत व्यवस्था, इमारतीची स्थिती तसेच संबंधित यंत्रणांकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेची त्यांनी माहिती घेतली. पाहणीदरम्यान निदर्शनास आलेल्या त्रुटी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तातडीने दूर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. मतदान यंत्रांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही बाब दुर्लक्षित राहू नये. त्याचवेळी सुरक्षा व्यवस्थेवर होणारा अनावश्यक खर्च टाळून आवश्यक तेथे उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीत तसेच मतदान यंत्र सुरक्षा कक्षाच्या पाहणीदरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांची संबंधित सर्व यंत्रणांनी काटेकोर अंमलबजावणी करावी. एसआयआर अंतर्गत प्रत्येक पात्र मतदाराचा मतदार यादीत समावेश सुनिश्चित करण्याबरोबरच मतदार यादी अद्ययावत व अचूक ठेवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये