महिला बचतगटांना सहकाराचे आर्थिक बळ
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ६ लाखांचे कर्ज वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, त्यांना स्वावलंबी बनवून आर्थिक व सामाजिक प्रगतीला चालना मिळावी, या उद्देशाने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा-महिला विभागाच्या वतीने महिला बचतगटांना कर्जवाटप करण्यात आले.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र श्रीनिवासराव शिंदे, उपाध्यक्ष संजय डोंगरे, मानद सचिव अवेशखान पठाण, समस्त संचालक मंडळ तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर भि. कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी कै. ॲड. बाबासाहेब वासाडे सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध उपक्रमांद्वारे सहकार सप्ताह साजरा केला जात आहे.
या उपक्रमांतर्गत दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा-महिला, शास्त्रीनगर, चंद्रपूर यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. बँकेचे संचालक तथा राजुरा विभागीय कर्ज समितीचे अध्यक्ष उल्हासराव करपे यांच्या हस्ते स्वस्तिक महिला बचतगट, श्रमिक नगर यांना ३ लाख रुपये, तर प्रगतिशील महिला बचतगट, कृष्णा नगर यांना ३ लाख रुपये, असे एकूण ६ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.
यावेळी बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यावर भर देण्यात आला. कर्जाचा योग्य वापर करून महिलांनी स्वावलंबी व्हावे, आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण करावे आणि कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत योगदान द्यावे, असा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात करंट खाते उघडणे, ठेवी, कर्ज योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आदी विविध बँकिंग व शासकीय योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. महिलांना उपलब्ध असलेल्या आर्थिक योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
महिला बचतगटांना केवळ कर्जपुरवठा न करता त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला दिशा देणे, हा बँकेचा प्रयत्न असल्याचे संचालक तथा राजुरा विभागीय कर्ज समितीचे अध्यक्ष उल्हासराव करपे यांनी सांगितले. सहकाराच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला बळ मिळत असून बचतगटांनी उपलब्ध योजनांचा प्रभावीपणे उपयोग करून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहकार महर्षी कै. ॲड. बाबासाहेब वासाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कर्जवाटप प्रसंगी अस्मिता धनविजय, प्रभारी शाखाधिकारी, ममता नन्नावरे, रोखपाल तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महिला बचतगटांना मिळालेला हा आर्थिक हातभार त्यांच्या व्यवसायवृद्धीसह स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे चित्र आहे.



