अवैध दारू वाहतुकीवर भद्रावती पोलिसांचा छापा
खोकरी फाट्यावर नाकाबंदीत २ लाख १३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त : एकास अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
वरोरा रोडकडून चंदनखेडा मार्गे मुधोलीकडे कारमधून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी खोकरी फाटा येथे नाकाबंदी करून कारवाई केली. या कारवाईत बेकायदेशीर बिअरचा साठा तसेच वाहन असा एकूण २ लाख १३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शरद नानाजी खारटकर (वय ४०, व्यवसाय ठेकेदारी, रा. मुधोली, ता. भद्रावती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी भद्रावती पोलीस स्टेशनचे पथक हद्दीत गस्त घालत असताना वरोरा रोडकडून चंदनखेडा मार्गे मुधोली गावाकडे कारमधून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसह खोकरी फाटा येथे नाकाबंदी केली.
नाकाबंदीदरम्यान संशयित हुंडाई सॅंट्रो कार (एमएच ३४ के ६६१२) अडवून चालकाची चौकशी करण्यात आली. चालकाने आपले नाव शरद नानाजी खारटकर असे सांगितले. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता कारच्या डिक्कीमध्ये विविध कंपन्यांच्या बिअरचा साठा आढळून आला.
कारवाईत काल्सबर्ग कंपनीची १२ बाटल्यांची एक पेटी (६५० मिली) किंमत ३ हजार १२० रुपये, किंगफिशर कंपनीची १२ बाटल्यांची एक पेटी (६५० मिली) किंमत २ हजार ४०० रुपये आणि लंडन पिल्सनर कंपनीच्या ५०० मिली क्षमतेच्या ७२ ॲल्युमिनियम कॅनच्या तीन पेट्या, किंमत ७ हजार ९२० रुपये असा दारूसाठा जप्त करण्यात आला. याशिवाय अंदाजे २ लाख रुपये किमतीची जुनी वापरती हुंडाई सॅंट्रो कारही पोलिसांनी ताब्यात घेतली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई प्रभारी अधिकारी परी. पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा देवानंद मनोहर डुकरे, पोउपनि संतोष केदार, पोहवा प्रशांत शेंदरे, पोहवा गोपाळ आतकुलवार आणि मपोअं प्रियदर्शनी बेरड यांच्या पथकाने केली.



