स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी ध्येय्य निश्चिती करावी
युवा व्याख्याते अनिकेत दुर्गे यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राळापेठ येथे विद्यार्थ्यांसाठी आयोजित प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमात अनिकेत दुर्गे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार, शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वासाचे महत्त्व पटवून दिले. “शालेय जीवन म्हणजे संस्कार आणि स्वप्नांची सुंदर सुरुवात असते,” असे सांगत त्यांनी स्वप्नपूर्तीसाठी मेहनतीला पर्याय नसून विद्यार्थ्यांनी आजपासूनच ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शाळेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे दुर्गे यांनी सांगितले. शिक्षणाचा उद्देश केवळ परीक्षेत चांगले गुण मिळवणे नसून जबाबदार, प्रामाणिक आणि आत्मविश्वासू व्यक्तिमत्त्व घडवणे हा आहे. चांगल्या सवयी, वेळेचे नियोजन, शिस्त, सकारात्मक विचार आणि कठोर परिश्रम यांना जीवनात स्थान दिल्यास यशाचा मार्ग अधिक सुकर होतो, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले, त्यांच्या प्रश्नांना दुर्गे यांनी संवादात्मक पद्धतीने उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदा पाटील राऊत होते तर वामन कोकुलवार, धीरज दुर्गे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक गुरुदेव बाबनवाडे यांनी केले.
प्रेरणादायी विचार, विद्यार्थ्यांशी थेट संवाद आणि भविष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा संदेश यामुळे राळापेठ शाळेतील हा मार्गदर्शन कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी असा ठरला.



