ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चा समारोप ; पोलीस मुख्यालय वर्धा ठरले ‘जनरल चॅम्पियन’ 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक ‘जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६’ चा भव्य समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ आज अत्यंत उत्साहात पार पडला. दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवात उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करत ‘पोलीस मुख्यालय वर्धा’ संघाने यंदाचे मानाचे ‘जनरल चॅम्पियनशिप’ (सर्वसाधारण विजेतेपद) पटकावले.

या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर वर्धा विभागाचे पोलीस अंमलदार चंद्रकांत वाघ यांनी पुरुषांमधून आणि पोलीस मुख्यालय वर्धा येथील प्रतीक्षा वरडोले यांनी महिलांमधून ‘सर्वोत्कृष्ट ॲथलीट’ (Best Athlete) म्हणून बहुमान मिळवला.

या समारोप समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त एन.आय.एस. (NIS) क्रीडा मार्गदर्शक इंद्रदेव शर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक, वर्धा हे होते. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते. या संपूर्ण क्रीडा महोत्सवात एकूण १६० खेळाडूंनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, तर या भव्य समारोप कार्यक्रमाला पोलीस दलातील ५० वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्धा जिल्ह्याचा आणि देशाचा गौरव करणाऱ्या गुणवंतांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर सुनैना डोंगरे आणि आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल मार्गदर्शक (Coach) पंकज टकोने यांना त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी, तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे, पंचांचे आणि आयोजन समितीचे त्यांच्या क्रीडापटू वृत्तीबद्दल व मोलाच्या सहकार्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने अधिकृत आभार मानण्यात आले.

     कार्यक्रमानंतर पोलीस मुख्यालय येथे आमंत्रित पाहुणे, विशेष अतिथी, सर्व खेळाडू, पंच, पत्रकार, पोलीस अधिकारी/ अंमलदार व त्यांच्या परिवाराकरिता स्नेहभोजन (बडाखाना) आयोजित करण्यात आला होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये