गोंडपिपरी तालुकास्तरीय ५४ वे विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
शैक्षणिक साहित्य व विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनात वढोलीच्या विद्यार्थिनींसह शिक्षकांची बाजी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ पंचायत समिती गोंडपिपरीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय 54 वे विज्ञान प्रदर्शन व प्राथमिक-माध्यमिक शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन 24 ऑक्टोबर २०२6 रोजी कार्मेल अकॅडमी, तारसा येथे उत्साहात पार पडले. तीन दिवस चाललेल्या या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी दामिनी महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फादर ऑगस्टीन अॅलनचेरी होते. प्रमुख अतिथी म्हणून चामोर्शीचे फादर मॅथ्यू, विस्तार अधिकारी समाधान भसारकर व वैभव खांडरे उपस्थित होते. यावेळी सर्व केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनात विविध गटांतून विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती सादर करून आपल्या कल्पकतेचे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे दर्शन घडविले. गैरआदिवासी गट (इयत्ता ६ ते ८) मध्ये प्रथम क्रमांक वढोली येथील शुभ्रा लक्ष्मीकांत चौधरी हिने पटकाविला. द्वितीय क्रमांक भंगाराम तळोधी येथील सपना मार्गनवार, तर तृतीय क्रमांक कार्मेल अकॅडमी, तारसा येथील पार्वणा साना हिने मिळविला.
इयत्ता ६ ते ८ दिव्यांग गटातून गणपूर येथील कुमारी राखी युवराज गेडाम हिने पारितोषिक मिळविले. इयत्ता ९ ते १२ गटात तारसा येथील साहिल आनंद चणकापुरे व विद्या साना यांनी यश संपादन केले. आदिवासी गटातून आकसापूर येथील दक्ष बोथले याने पारितोषिक पटकाविले.
शैक्षणिक साहित्य व विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनात शिक्षकांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.
उल्लेखनीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत सांजो कॉन्व्हेन्ट येथील सक्षम अश्विनी शैलेश झाडे यांनी स्पर्धेतील सर्व प्रश्नांची उत्तरे देत प्रथम क्रमांक पटकाविला.
प्राथमिक शिक्षक प्रतिकृती गटात गणपूर येथील पी. टी. खोब्रागडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. माध्यमिक शिक्षक प्रतिकृती गटात वढोली येथील माध्यमिक शिक्षक रुपेश निमसरकार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. प्रयोगशाळा परिचर गटात राकेश रेवतकर यांनी पारितोषिक मिळविले.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती, सर्जनशीलता आणि प्रयोगशीलता विकसित करण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळवून देणारा विज्ञान प्रतिकृतींचा हा तीन दिवसीय मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



