‘कोटा पूर्ण झाला..!’च्या नावाखाली चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्जास नकार
पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकेचे दार बंद, शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गोंडपिपरी शाखेकडून पीक कर्जासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. पीक कर्जाचा निर्धारित कोटा पूर्ण झाल्याचे कारण सांगत नवीन कर्ज प्रकरणे स्वीकारण्यास अथवा कर्ज वितरित करण्यास बँकेकडून असमर्थता दर्शविली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आधीच मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही भागात अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि धान पिकांना पाण्याचा ताण जाणवत असून पिके करपण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काही भागात पेरणीनंतर आवश्यक प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतीचा खर्च भागविण्यासाठी पीक कर्जाची गरज असताना बँकेकडूनच कर्ज नाकारले जात असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
दरम्यान, वडकूली-बोरगाव तसेच तालुक्यातील अन्य गावांतील काही शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी बँकेत भेट दिली. मात्र, पीक कर्जाचा कोटा पूर्ण झाल्याचे सांगत त्यांना कर्ज मिळणार नसल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावरून आदेश असल्याने आम्ही काही करू शकत नसल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांना ऐन शेतीच्या हंगामात आर्थिक मदतीची गरज असताना पीक कर्जाचा कोटा पूर्ण झाल्याचे कारण पुढे करून कर्ज नाकारले जात असेल, तर शेतकऱ्यांनी शेतीचा खर्च कसा भागवायचा, असा सवाल उपस्थित होत आहे. बँकेने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवू नये. गरजू शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी पीक कर्जाचा कोटा वाढविण्याबाबत वरिष्ठ स्तरावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या प्रश्नाकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मी व अन्य शेतकऱ्यांनी चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा गोंडपिपरी येथे पीक कर्ज घेण्याकरिता गेलो असता, आम्हाला कोटा पूर्ण झाल्याचे सांगितले व पीक कर्ज देण्यास नकार दिला.
*बंडू तिवाडे, शेतकरी वडकुली*



