गोंडपिपरी येथे “सेवा संकल्प अभियाना”चा शुभारंभ
आरोग्य आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी सुलभतेने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गोंडपिपरी येथे दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ व आरोग्य शिबिराचे आयोजन करून ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ करण्यात आला.
सहाय्यक जिल्हाधिकारी आकाश वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये महसूल, नगरपंचायत, पंचायत समिती, कृषी तसेच इतर विविध विभागांच्या माध्यमातून नागरिकांना प्रत्यक्ष लाभ व सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभांचे वितरण, वर्ग-२ ते वर्ग-१ जमिनीबाबतच्या आदेशांचे वितरण, नवीन मतदार नोंदणी आदी महसूलविषयक सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.
तसेच नगरपंचायतीच्या माध्यमातून घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. नागरिकांच्या सोयीसाठी कचराकुंडीचे वितरण देखील करण्यात आले.
यासोबतच आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. विविध आरोग्य तपासण्या व आवश्यक मार्गदर्शन नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले.
पंचायत समिती, कृषी विभाग व इतर विभागांच्या विविध योजनांतील लाभांचेही वितरण यावेळी करण्यात आले. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचविणे आणि प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या शिबिरास उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा, तहसिलदार शुभम बाहकर, गोंडपिपरी नगरपंचायत नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, मुख्याधिकारी विवेक चौधरी, गटविकास अधिकारी संजय नैताम, नगरसेवक राकेश पूण तालुका कृषी अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानच्या माध्यमातून प्रशासनाने “शासनाच्या योजना आणि सेवा नागरिकांच्या दारी” या भावनेतून नागरिकांना अधिक गतिमान, पारदर्शक व सुलभ सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.



