महात्मा गांधी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर : महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि युवकांचे प्रेरणास्थान डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाची वृद्धी व्हावी आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथील ग्रंथपाल डॉ. सारिका साबळे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून वाचनाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून ज्ञान, विचारशक्ती आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचाही त्यांनी उल्लेख केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र डी. देव होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक विकासामध्ये वाचनाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. या प्रसंगी महाविद्यालयाचे IQAC समन्वयक डॉ. आर. वाय. पाटले, विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ. अजयकुमार शर्मा, डॉ. संदीप घोडिले आणि प्रा. चेतन वैद्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. मनोहर बांद्रे होते. कार्यक्रमात शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पुस्तके ही ज्ञानाची अमूल्य संपत्ती असून नियमित वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते, विचारांना चालना मिळते आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध होते, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. वाचन संस्कृती जोपासण्याचा संकल्प व्यक्त करीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



