भद्रावतीचा ऐतिहासिक शिंगाडा अस्तित्वाच्या उंबरठ्यावर
तलावांचे प्रदूषण, शासकीय उदासीनतेमुळे भोई– ढिवर समाजाचा पारंपरिक व्यवसाय संकटात : संवर्धनाची तातडीची गरज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुका हा तलावांचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तलावांवर आधारित भोई– ढिवर समाजाचा शिंगाडा उत्पादनाचा पारंपरिक व्यवसाय अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. एकेकाळी भद्रावतीचा शिंगाडा आपल्या चव, दर्जा आणि पौष्टिकतेमुळे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशातील अनेक बाजारपेठांमध्ये प्रसिद्ध होता. मात्र, तलावांचे वाढते प्रदूषण, शहरातील सांडपाणी आणि शासकीय दुर्लक्षामुळे हा ऐतिहासिक व्यवसाय आज नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.
*पौष्टिकतेचा खजिना असलेला शिंगाडा*
शिंगाडा हे पाण्यात येणारे अत्यंत पौष्टिक फळ असून त्यामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि विविध जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. हे फळ शरीराला ऊर्जा देणारे, पचनास सहाय्यक आणि आरोग्यास लाभदायक मानले जाते. त्यामुळे ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत शिंगाड्याला विशेष मागणी असते.
*उपवासापासून उद्योगापर्यंत वापर*
शिंगाडा ताजा, उकडून किंवा भाजून खाल्ला जातो. त्याचबरोबर वाळवून त्याचे पीठ तयार केले जाते. या पिठाचा वापर उपवासातील पुरी, थालीपीठ, पराठे, हलवा, लाडू आणि इतर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. काही ठिकाणी मिठाई उद्योगातही शिंगाड्याचा वापर केला जातो. त्यामुळे शिंगाडा हे केवळ फळ नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावणारे महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते.
*भद्रावतीची शिंगाडा लागवड – परंपरेची ओळख*
भद्रावती तालुक्यातील भोई– ढिवर समाज अनेक दशकांपासून तलावांमध्ये शिंगाड्याच्या वेलींची लागवड करत आला आहे. पावसाळ्यात तलावांमध्ये वेलींची लागवड केली जाते. वेलींना रोग व किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आवश्यक ती उपाययोजना केली जाते. साधारण हिवाळ्यापासून शिंगाडा काढणीला सुरुवात होते. या व्यवसायावर शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
*देशभर पोहोचलेली भद्रावतीची चव*
एकेकाळी भद्रावतीचा शिंगाडा हैदराबाद, विजयवाडा, आदिलाबाद, कागजनगर, शिरपूरसह विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर विक्रीस जात होता. येथील दर्जेदार वेलींची मागणी वाढल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, मूल, सावली, भिसी, चिमूर, जांभूळघाट, आष्टा, चांदणखेडा, चोरा, वायगाव तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मुकुटबन, पांढरकवडा आणि नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, कुही, मांढळ, वेलतूर, उमरेड येथेही शिंगाड्याची लागवड सुरू झाली.
*प्रदूषणामुळे उद्ध्वस्त होत आहेत तलाव*
मात्र, शहराचा वाढता विस्तार आणि तलावांमध्ये मिसळणारे घाण सांडपाणी यामुळे विंजासन, आसना, अर्जुनवाटिका, चिंतामणी, मल्हारा, पिंडोनी आदी तलावांतील पाण्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. परिणामी शिंगाड्याच्या वेलींची वाढ खुंटत असून उत्पादनात सातत्याने घट होत आहे. अनेक उत्पादकांना हा व्यवसाय सोडण्याची वेळ आली आहे.
*शासकीय मदतीचा अभाव*
शिंगाडा हे भद्रावतीचे वैशिष्ट्यपूर्ण पीक असूनही कृषी विभाग किंवा संबंधित यंत्रणांकडून या पिकासाठी विशेष संशोधन, प्रशिक्षण, आर्थिक अनुदान, बाजारपेठ उपलब्ध करून देणे किंवा तलाव संवर्धनासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत उत्पादक व्यक्त करत आहेत.
*तलाव वाचले तरच शिंगाडा वाचेल*
भद्रावतीच्या सांस्कृतिक आणि आर्थिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेला शिंगाडा आणि भोई– ढिवर समाजाची परंपरा टिकवायची असेल, तर तलावांचे प्रदूषण तातडीने रोखणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे, शिंगाडा उत्पादकांसाठी विशेष विकास योजना राबविणे, आधुनिक तंत्रज्ञान व बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अन्यथा, एकेकाळी देशभर प्रसिद्ध असलेला “भद्रावतीचा शिंगाडा” पुढील पिढ्यांसाठी केवळ इतिहास ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
*विशेष उल्लेख :*
भद्रावतीचा शिंगाडा हा केवळ स्थानिक उत्पादन नसून त्याची ओळख राष्ट्रीय पातळीवरही आहे. लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रम ‘कौन बनेगा करोड़पती’ मध्ये सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी “Water Nuts” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फळाबाबत प्रश्न विचारला होता. त्याचे योग्य उत्तर “शिंगाडा (Water Chestnut)” असे होते. यावरून शिंगाड्याचे पौष्टिक आणि वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व अधोरेखित होते.
*प्रतिक्रिया*
“भद्रावतीचा शिंगाडा हा केवळ एक शेतीपूरक व्यवसाय नाही, तर भोई–ढिवर समाजाच्या अनेक पिढ्यांची परंपरा, उपजीविकेचे साधन आणि भद्रावतीची स्वतंत्र ओळख आहे. पूर्वी भद्रावतीच्या शिंगाड्याला महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशातील विविध बाजारपेठांमध्ये मोठी मागणी होती. मात्र, तलावांमध्ये मिसळणारे सांडपाणी, वाढते प्रदूषण, पाण्याची खालावत चाललेली गुणवत्ता आणि शासनाचे अपुरे लक्ष यामुळे आज शिंगाडा उत्पादन मोठ्या संकटात सापडले आहे.
तलावांचे संवर्धन आणि शिंगाडा उत्पादन यांचा थेट संबंध आहे. त्यामुळे सर्वप्रथम भद्रावती तालुक्यातील शिंगाडा उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या तलावांचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन करून त्यामध्ये सांडपाणी मिसळणार नाही, याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शिंगाडा उत्पादकांना आधुनिक लागवड तंत्रज्ञान, प्रशिक्षण, आर्थिक मदत, विमा आणि योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
शासनाने भद्रावतीच्या शिंगाड्याला विशेष कृषी उत्पादन म्हणून प्रोत्साहन देऊन त्याच्या ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी स्वतंत्र योजना राबवावी. शिंगाड्यापासून पीठ, खाद्यपदार्थ व इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारल्यास समाजातील युवकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात.
तलाव वाचले तरच शिंगाडा वाचेल आणि शिंगाडा वाचला तरच भोई–ढिवर समाजाची ही पारंपरिक उपजीविका वाचेल.’ त्यामुळे भद्रावतीच्या ऐतिहासिक शिंगाड्याच्या संवर्धनासाठी शासन, स्थानिक प्रशासन, मत्स्य विभाग, कृषी विभाग आणि समाजातील उत्पादक यांनी एकत्रितपणे तातडीने ठोस कृती आराखडा तयार करणे ही काळाची गरज आहे.”
— *दिलीप किसनराव मांढरे, अध्यक्ष,मच्छिंद्र मच्छुआँ सहकारी संस्था मर्यादित, भद्रावती
प्रतिक्रिया :
“पूर्वी भद्रावती शहर व तालुक्यातील तलावांतून मुबलक शिंगाडा मिळत असल्याने आम्हाला स्थानिक पातळीवरच स्वस्तात माल मिळायचा. मात्र शहरातील सांडपाणी व वाढत्या प्रदूषणामुळे शिंगाडा उत्पादन घटले आहे. आता उमरेड, भिवापूर तसेच भिसी, जांभूळघाट अशा दूरच्या भागांतून शिंगाडा आणावा लागतो. वाहतूक खर्च वाढल्याने उत्पन्नात घट झाली असून, पूर्वीसारखा नफा मिळत नाही. त्यामुळे शिंगाडा विक्रीचा व्यवसायही आता परवडेनासा झाला आहे.”
*राजू झित्रुजी रुयारकर, चिल्लर शिंगाडा विक्रेता*



