ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गरीब व गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब राजुरा तर्फे स्कूल बॅगचे वाटप

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

रोटरी क्लब राजुरा तर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. हा सामाजिक उपक्रम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्राथमिक शाळा, नगरपरिषद राजुरा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे असिस्टंट गव्हर्नर श्री. अनुपकुमार यादव होते. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार श्री. मंगेश श्रीराम व पत्रकार श्री. जाकीरजी सय्यद उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष श्री. राजू गोखरे, सचिव श्री. किशोर हिंगाणे, उपाध्यक्ष श्री. अमजद खान, माजी अध्यक्ष श्री. कमल बजाज, IPP श्री. निखिल चांडक, संचालक श्री. अहमद शेख, श्री. सुबोध डाहुले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा चुटे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

        रोटरी क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यामागचा उद्देश केवळ शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे नसून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, बुद्धिकौशल्य वृद्धिंगत करणे, शिक्षणाची प्रेरणा निर्माण करणे आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोटरी क्लब सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान रोटरी क्लबचे उपाध्यक्ष श्री. अमजद खान यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यामुळे कार्यक्रमातील आनंद द्विगुणित झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. बॅग मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून उपस्थितांचे मनही भारावून गेले.

        यावेळी पालक व विद्यार्थ्यांनी रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचे आभार मानत, “आपण आमच्या शाळेत पुन्हा पुन्हा यावे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे आणि अशाच प्रकारे सामाजिक उपक्रम राबवावेत,” अशी भावनिक विनंती केली. त्यांच्या या आपुलकीच्या शब्दांनी उपस्थित रोटरी सदस्यही भारावून गेले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भविष्यातही शाळेला आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य देण्याची ग्वाही रोटरी क्लबच्या वतीने देण्यात आली. कार्यक्रमाचे सुंदर संचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा चुटे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये