ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मध्यपींच्या व्यसनमुक्तीसाठी ‘अल्कोहोलिक्स अनॉनिमस’ची जनजागरण सभा

आक्सापूर येथे "मध्यपाश एक जीवघेणा आजार" विषयावर विचारमंथन.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ मद्यपानामुळे व्यक्तीचे आरोग्य, कुटुंब आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त होते. त्यामुळे मद्यपानाकडे केवळ एक वाईट सवय म्हणून न पाहता तो एक जीवघेणा आजार असल्याचे सांगत व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी आक्सापूर येथे ‘अल्कोहोलिक्स अनॉनिमस’ ची जनजागरण सभा घेण्यात आली. या सभेला गोंडपिपरी, पोंभुर्णा आणि मूल आंतरसमूह क्रमांक २ मधील शेकडो सदस्य व नागरिक उपस्थित होते.

गोपीनाथ मुंडे सभागृह, आक्सापूर येथे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता या जनजागरण सभेचे आयोजन करण्यात आले. मद्याच्या आहारी गेल्यानंतर व्यक्तीचे मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडण्यासोबतच त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो. अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह आणि सामाजिक समस्या निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्तीच्या प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

आनंदालय व्यसनमुक्ती केंद्र वरोरा चे संचालक आनंद झाडे, सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापले,महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रवीण धोडरे यांच्यासह कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. मद्यपानाच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्तीने निराश न होता व्यसनातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच कुटुंबीयांनीही अशा व्यक्तींना आधार देण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

‘अल्कोहोलिक्स अनॉनिमस’च्या माध्यमातून व्यसनाधीन व्यक्तींना एकमेकांच्या अनुभवातून आधार देत व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरणा दिली जाते. व्यसनातून बाहेर पडलेल्या व्यक्तींचे अनुभव आणि व्यसनमुक्तीचा प्रवास याबाबतही यावेळी उपस्थितांना माहिती देण्यात आली. त्यामुळे व्यसनमुक्तीचा संदेश अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचला.

दरम्यान, आक्सापूर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन नैताम, रोशन मडावी व त्यांच्या मित्रपरिवाराने या जनजागरण सभेच्या आयोजनासाठी विशेष पुढाकार घेतला. आनंदमय समूह आक्सापूर यांचेकडून दर शुक्रवार ला सहा ते आठ वाजेपर्यंत नियमित सभा होणार असल्याचे सांगितले. व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी अशा जनजागरण सभा गावागावांत घेण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये