राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न द्या!
सावलीत गुरुदेव भक्तांचा एल्गार ; घोषणांनी शहर दुमदुमले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ.शेखर प्यारमवार
तहसीलदारमार्फत राष्ट्रपती,पंतप्रधान,मुख्यमंत्र्यांना निवेदन
समाजप्रबोधन, ग्रामविकास, राष्ट्रभक्ती, व्यसनमुक्ती आणि मानवतेचा संदेश आपल्या कार्यातून जनमानसात रुजविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी सावली तालुका गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सोमवारी शहरात भव्य दिंडी काढण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयजयकाराने आणि घोषणांनी सावली शहराचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.
सावली शहरातील गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यालयापासून या दिंडीला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून गुरुदेव भक्तांनी दिंडीत सहभाग घेतला. हातात मागणीचे फलक, मुखी राष्ट्रसंतांचा जयजयकार आणि मनात गुरुदेवांच्या विचारांप्रती निष्ठा घेऊन मोठ्या संख्येने भक्त दिंडीत सहभागी झाले होते.
दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत असताना नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न मिळालेच पाहिजे’, ‘गुरुदेवांचा विजय असो’, ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर भारावून गेला. दिंडीच्या माध्यमातून राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी जनजागृती केली. ग्रामस्वच्छता, ग्रामविकास, शिक्षण, श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश त्यांनी आपल्या कीर्तन, प्रवचन आणि साहित्याच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविला. ‘ग्रामगीता’ या त्यांच्या महान साहित्यकृतीतून त्यांनी आदर्श ग्रामजीवनाची दिशा समाजाला दिली. त्यांच्या विचारांची आणि कार्याची व्याप्ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशभर पोहोचली.
अशा महान राष्ट्रसंताच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा आणि त्यांच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी भावना गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
तहसील कार्यालयात निवेदन
शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केल्यानंतर दिंडीचा तहसील कार्यालय परिसरात समारोप करण्यात आला. यावेळी तालुका गुरुदेव सेवा मंडळाच्या शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात निवेदन सादर केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी शासनाच्या निदर्शनास आणून देत हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आले.
राष्ट्रसंतांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा उचित सन्मान मिळवून देण्यासाठी भविष्यातही लोकशाही मार्गाने विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
गुरुदेव भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सावलीतील ही दिंडी केवळ मागणीपुरती न राहता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर करणारी चळवळ ठरली. यावेळी सावली तालुका गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .



