एक महिन्यापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद
सावरी जंगलालगतच्या गावांमध्ये दहशत : वनविभागाच्या प्रयत्नांना यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मौजा सावरी परिसरातील जंगलालगतच्या गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सावरी परिसरात बिबट्याचा सातत्याने वावर आढळून येत होता. बिबट्याच्या दर्शनामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जंगलालगतच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक तसेच शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. याबाबत ग्रामस्थांनी वनविभागाकडे तक्रारी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. बिबट्याचा वावर ज्या परिसरात वारंवार आढळून येत होता, त्या ठिकाणी एका घराच्या मागील बाजूस बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. पिंजऱ्यात बिबट्याला आकर्षित करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती.
अखेर ३० ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून त्याला ताब्यात घेतले.
वनविभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, जेरबंद झालेला बिबट्या मादा प्रजातीचा असून त्याचे वय अंदाजे आठ महिने असल्याचे सांगण्यात आले. बिबट्याची वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
गेल्या महिनाभरापासून बिबट्याच्या वावरामुळे सावरी परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. वनविभागाने केलेल्या या कारवाईबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, जंगलालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळावे, तसेच वनविभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



