भरधाव दुचाकीची गायीला धडक : गाय जागिच ठार
दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी : बेफाम वाहनचालकांवर अंकुशाची मागणी

चांदा ते बारामती. अतुल कोल्हे
रेल्वे स्टेशनकडून भद्रावती शहराकडे येणाऱ्या मुख्य मार्गावरील राजमणी गार्डनसमोर सोमवारी सायंकाळच्या सुमारास भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या गाईला जोरदार धडक दिल्याने गायीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक एमएच ३४ सीएस २२५८ असा असून जखमी युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी बेधुंद व भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गणेश मंदिर परिसरात काही तरुणांकडून अमली पदार्थांचे सेवन करून धूम स्टाईलमध्ये स्टंटबाजी करत भरधाव दुचाकी चालविली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे पादचारी, शालेय विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून वावरावे लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे अवघ्या एका वर्षापूर्वी याच परिसरात झालेल्या भीषण अपघातात खडसे दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. तसेच ढोरवासा येथील एका नागरिकालाही अपघातात जीव गमवावा लागला होता. वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून पोलिसांनी या मार्गावर नियमित गस्त वाढवून भरधाव वाहनचालक, स्टंटबाज तरुण व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सदर अपघातामुळे पुन्हा एकदा वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आणखी जीवितहानी होण्यापूर्वी भद्रावती पोलिसांनी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



