सायवन फाट्याजवळ बिना रॉयल्टीचा रेती भरलेला हायवा पकडला
भद्रावती पोलिसांची मोठी कारवाई : २० लाख ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रवती :_ चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध रेती तस्करीविरोधात भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई करत आठ ब्रास रेतीसह तब्बल २० लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा आणि पोलिस कर्मचारी प्रेमकुमार बावनकर व पोलिस हवालदार जगदीश या पथकाने रात्रीच्या गस्ती दरम्यान सायवन फाट्याजवळ रॉयल्टीविना रेती वाहून नेणारा टाटा हायवा पकडला.
पोलिसांनी हायवा चालक अरुण तुकाराम मडावी याला ताब्यात घेतले असून, वाहनमालक मिथिलेश चन्ने यांच्याविरुद्धही कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सदर रेती पैनगंगा नदीघाटातून आणण्यात आली होती आणि ती सायवन येथील अॅश डॅमजवळील सिमेंट साहित्य तयार करणाऱ्या कंपनीत नेली जात होती.
या कारवाईत सुमारे २० लाख रुपये किमतीचा हायवा आणि ६४ हजार रुपये किमतीची रेती जप्त करण्यात आली आहे.
किरकोळ वाहतूकदारांपुरती कारवाई मर्यादित न राहता, अवैध रेती तस्करीच्या संपूर्ण साखळीचा तपास होणार का? हा प्रश्न आता या मोठ्या कार्यवाहीमुळे अधिक पारदर्शक झाला आहे.लहान असो अथवा मोठा असो कायद्यापुढे सर्वच सारखे असा संदेश पोहचविण्यात भद्रावती पोलिस यशस्वी झाले असल्याचे बोलल्या जात आहे.
परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक सचिन खेत्रे यांचे मार्गदर्शनाखाली संजय मिश्रा आणि त्यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे. आता या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या कार्यवाहीमुळें अवैध तस्करात खळबळ माजल्याचे दिसून येत आहे.



