ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बाबासाहेबांच्या त्यागाची आठवण, वर्ध्यात भीम टायगर सेनेचा समतेचा हुंकार…

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महिलांना समान हक्क, संपत्तीचा अधिकार आणि सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून ऐतिहासिक संघर्ष उभारणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर ११ ऑक्टोबर रोजी वर्ध्यात करण्यात आला. हिंदू कोड बिलाला तत्कालीन राजकीय नेतृत्वाकडून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी केंद्रीय कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या ऐतिहासिक घटनेची खंत व्यक्त करत त्यांच्या त्यागाला आणि संघर्षाला अभिवादन करण्यासाठी भीम टायगर सेनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

वर्ध्यातील सिव्हिल लाईन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ हा अभिवादन कार्यक्रम पार पडला. भीम टायगर सेना जिल्हाध्यक्ष विशाल शरद रामटेके आणि विदर्भ अध्यक्ष अतुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी हिंदू कोड बिलाच्या लढ्याची आठवण जागवली आणि महिलांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महिलांना विवाह, घटस्फोट, वारसा आणि संपत्तीच्या अधिकारांमध्ये समानता मिळावी, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. मात्र, या विधेयकाला तत्कालीन संसदेत अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे १९५१ मध्ये त्यांनी केंद्रीय कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. महिलांच्या हक्कांचा प्रश्न हा केवळ कायद्यापुरता मर्यादित नसून तो सामाजिक समता, मानवी प्रतिष्ठा आणि न्यायव्यवस्थेशी जोडलेला असल्याचा संदेश त्यांच्या संघर्षातून मिळतो. याच ऐतिहासिक पार्श्वभूमीवर भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी तत्कालीन राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. महिलांच्या समान हक्कांसाठी लढणाऱ्या महामानवाला मंत्रिपदाचा त्याग करावा लागला, ही भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील वेदनादायी घटना असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. घोषणांनी परिसर दुमदुमला कार्यक्रमादरम्यान जय भीम ‘जय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जयघोष करण्यात आला. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये प्रत्यक्ष जीवनात रुजविण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला. बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे आणि महिलांच्या हक्कांसह वंचित घटकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज उठविणे, हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष विशाल शरद रामटेके, विदर्भ अध्यक्ष अतुल दिवे यांच्यासह सूरज बडगे, राकेश पांडे, पंकज लभाने, अनवेश सांगोले, आदर्श रामटेके, संकेत मेश्राम, मंगेश सूर्यवंशी, आदर्श सांगोले, प्रशांत वासनिक, सौरभ हातोले, कन्हैया उइके, पराग धवन सर, कुणाल हातोले, साहिल अंबादे, अनिकेत गजभिये, नितू सांगोले, नयन रामटेके, अंकुश मुंजेवार, उत्कर्ष वालमड्रे, सुमित गजभिये, अमित गजभिये, अमित नाईक, राजेश फुलमाळी, प्रशांत रामटेके, प्रितेश वासनिक, वसीम कुरेशी, अहमद पठाण, विनोद सोळंकी, अनिल गेडाम आणि सुरज गणवीर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजीनाम्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचे स्मरण करून, त्यांच्या समतावादी विचारांचा जागर करणे आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहणे, हा या अभिवादन कार्यक्रमाचा मुख्य संदेश ठरला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये