ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत गांजा विक्रीचा डाव उधळला! : तीन आरोपी ताब्यात

कारमधून १.१७० किलो गांजासह ५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    शहरातील पंचशील वॉर्ड परिसरात पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून गांजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई करीत गांजा विक्रीचा डाव उधळून लावला. या कारवाईत १ किलो १७० ग्रॅम गांजा, तीन मोबाईल व गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण सुमारे ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे.

२४ ऑगस्ट रोजी भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू असताना पोलिसांना पंचशील वॉर्ड परिसरात एमएच-४९-एई-१३४० क्रमांकाच्या पांढऱ्या स्विफ्ट डिझायर कारमधून गांजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून पोलिस पथकाने पंच व वजनमाप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संशयित वाहनाची झडती घेतली.

झडतीदरम्यान कारमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत भरलेला गांजा आढळून आला. वजन केल्यानंतर त्याचे प्रमाण १ किलो १७० ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. जप्त गांजाची किंमत १५ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय संशयितांकडील तीन मोबाईल फोन व गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर कार असा मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी वाजिद वहाब शेख (वय २३), आरिफ कौसर सैय्यद (वय २१) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क), २०(ब)(२)(ब) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन एस. खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. जप्तीची संपूर्ण प्रक्रिया पंच, छायाचित्रकार आणि वजनमाप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.

अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात झालेल्या या कारवाईमुळे भद्रावती शहरात खळबळ उडाली आहे. गांजा विक्रीच्या अवैध व्यवहारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये