ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ई-पिक पाहणी तातडीने सुरू करा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय नको

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             खरीप हंगामातील ई-पिक पाहणी तातडीने सुरू करावी तसेच अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केवळ ई-पिक नोंद नसल्याच्या कारणावरून शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी युवाशक्ती सोशल वेलफेअर फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य व युवा शेतकऱ्यांनी केली. यासंदर्भात त्यांनी भद्रावतीचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी संदीप गोविंद पानमंद यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेनुसार गाव नमुना क्रमांक ७ हा अधिकार अभिलेख असून गाव नमुना क्रमांक १२ मध्ये पिकांची नोंद केली जाते. या नोंदीच्या आधारे पीक विमा, नुकसानभरपाई, विविध शासकीय अनुदाने, किमान आधारभूत किंमत (MSP) अंतर्गत खरेदी तसेच सीसीआयमार्फत कापूस खरेदीचा लाभ मिळतो. मात्र जून-जुलैमध्ये खरीप पिकांची पेरणी पूर्ण होऊनही ऑगस्ट महिना संपत आला असताना भद्रावती तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांत अद्याप ई-पिक पाहणी सुरू झालेली नसल्याकडे यावेळी तहसीलदारांचे लक्ष वेधण्यात आले.

दरम्यान, अतिवृष्टी आणि पुरामुळे वर्धा नदीकाठच्या घोणाड, कोची, पिपरी, तेलवासा, चारगाव आदी गावांतील शेतांमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत आता ई-पिक पाहणीसाठी अधिकारी किंवा सहाय्यक शेतात पोहोचले, तर अनेक ठिकाणी प्रत्यक्ष पीकच शिल्लक नसल्याने योग्य नोंद कशी होणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

ई-पिक पाहणी वेळेत न झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ ई-पिक नोंद उपलब्ध नसल्यामुळे नुकसानभरपाई, पीक विमा, एमएसपी किंवा सीसीआय खरेदीच्या लाभापासून वंचित ठेवणे अन्यायकारक ठरेल. अशा प्रकरणांत पंचनामा, सातबारा तसेच महसूल व कृषी विभागाच्या उपलब्ध नोंदींच्या आधारे मदत मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली.

खरीप पिकांची कापणी सुरू होण्यापूर्वी संपूर्ण ई-पिक पाहणी पूर्ण करावी, आवश्यक असल्यास अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून प्रक्रिया गतिमान करावी आणि ई-पिक पाहणीसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. ई-पिक पाहणी पूर्ण न झाल्याने कोणत्याही शेतकऱ्याला शासनाच्या योजना, नुकसानभरपाई, पीक विमा, एमएसपी किंवा सीसीआयमार्फत कापूस खरेदीच्या लाभापासून वंचित ठेवू नये, अशी विनंती तहसीलदार पानमंद यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी शुभम दिलीप मत्ते, सूरज साहा, निश्चय एकरे, वैभव शेरकी, धनराज गौरकर, विवेक बोरीकर यांच्यासह युवाशक्ती सोशल वेलफेअर फाउंडेशनचे सदस्य, युवा शेतकरी व अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये