भद्रावती तालुक्यात ६९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत
४ सप्टेंबरला पंचायत समिती सभागृहात : इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे तहसीलदारांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांच्या आरक्षणाबाबत सुधारित तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने भद्रावती तालुक्यातील एकूण ६९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ही सोडत ४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता पंचायत समिती सभागृह, भद्रावती येथे आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रातील असाधारण भाग चार-ब, असाधारण क्रमांक ४३८, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत सुधारणा करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील आरक्षण निश्चित करण्याच्या प्रक्रियेनुसार ही सोडत घेण्यात येणार आहे. यामध्ये महिला सरपंच पदाच्या आरक्षणाचाही समावेश आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच आणि उपसरपंच) निवडणूक नियम, १९६४ मधील तरतुदींनुसार सरपंच पदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांच्या कार्यालयाकडून १९ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित यंत्रणेला कळविण्यात आले आहे.
त्यानुसार भद्रावती तालुक्यातील सर्व संबंधित ग्रामपंचायती, इच्छुक उमेदवार तसेच ग्रामस्थांनी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार भद्रावती यांनी केले आहे. आरक्षण सोडतीबाबतची प्रसिद्धी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर करण्यात यावी तसेच प्रसिद्धी अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे आता तालुक्यातील इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले असून, कोणत्या ग्रामपंचायतीचे सरपंच पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.



