शेणगाव प्राथमिक केंद्रातील रिक्त पदे भरा
रिक्त पदांमुळे आरोग्यसेवा कोलमडली; तातडीने भरती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेल्या शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यासह तब्बल १० महत्त्वाची पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने आरोग्य व्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. डॉक्टरांसह आवश्यक मनुष्यबळाअभावी रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत असून, अनेकांना नाईलाजाने खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
शेणगाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेत ग्रामपंचायत शेणगाव, ग्रामपंचायत सोरेकसा आणि पत्रकार संरक्षण संघ महाराष्ट्र यांच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी कटारे यांना संयुक्त निवेदन देण्यात आले. यावेळी शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व रिक्त पदे तातडीने भरण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
निवेदनानुसार, शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी १, औषध निर्माण अधिकारी १, परिचर २, आरोग्य सेवक २, सुमन योजना अंतर्गत अधिपरिचारिका २, तर कुंभेझरी आणि टेकामांडवा उपकेंद्रात प्रत्येकी एक आरोग्य सेविका, अशी एकूण १० पदे रिक्त आहेत.
आरोग्य केंद्रातील महत्त्वाची पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून, नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा वेळेत मिळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासी नागरिकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
“आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त ठेवून आदिवासी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन शेणगाव आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरावीत आणि नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, रिक्त पदे तातडीने भरण्यात आली नाहीत, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे आता आरोग्य विभाग या गंभीर प्रश्नावर कोणती भूमिका घेतो, याकडे शेणगावसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी उपसरपंच नरसिंग हमणे, सदस्य नंदाताई मुसने, सदस्य अजय तिरणकर, मनसे तालुकाप्रमुख हकानी शेख, भाजप कार्यकर्ते प्रेमदास राठोड, अजय खंदारे, मिथुन लांडगे, नाशिक कपाळे, माधव कांबळे, सोरेकसा ग्रामपंचायतीचे सरपंच सागर कोटनाके, देविदास खंदारे तसेच पत्रकार संरक्षण संघ महाराष्ट्राचे विदर्भ अध्यक्ष सय्यद शब्बीर जागीदार उपस्थित होते.



