ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी महाविद्यालय येथे नशामुक्त भारत अभियान उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

“युवाशक्तीच्या सामर्थ्याचा उपयोग करून नशामुक्त भारत आणि विकसित भारत घडविण्याचा राष्ट्रीय संकल्प” या ध्येयाने प्रेरित नशामुक्त भारत अभियान महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे रविवार रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या अभियानात महाविद्यालयातील १०० हून अधिक राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र डी. देव, राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) कार्यक्रम अधिकारी श्री. चेतन ए. वानखेडे, तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशातील युवा पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवून निरोगी, सक्षम आणि जबाबदार समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले. भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी देशभरातील एक कोटीहून अधिक युवकांशी आभासी माध्यमातून संवाद साधत नशामुक्त भारताच्या राष्ट्रीय संकल्पाला बळ दिले. त्यांच्या प्रेरणादायी संदेशातून युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून राष्ट्रनिर्माणात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी प्राचार्य डॉ. शैलेंद्र डी. देव यांनी उपस्थित विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात सामूहिक शपथ दिली. उपस्थितांनी व्यसनांपासून स्वतः दूर राहण्याबरोबरच आपल्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला आणि समाजातील इतर घटकांना व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्याचा दृढ संकल्प केला.

कार्यक्रमादरम्यान “नशामुक्त युवा – सशक्त भारत”, “व्यसनाला नकार, उज्ज्वल भविष्याचा स्वीकार” आणि “युवाशक्ती घडवेल नशामुक्त भारत” या संदेशातून जनजागृती करण्यात आली.

या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती, सामाजिक जबाबदारी, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्रनिर्माणाची भावना अधिक दृढ झाली. NSS स्वयंसेवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह प्राप्त झाला. महाविद्यालयाने युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी घेतलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये