अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नका; पालकांवरही होणार कारवाई.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : जिल्ह्यात दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत असून, अल्पवयीन मुलांकडून शहरात विनापरवाना वाहन चालविल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेने पालकांना आपल्या अल्पवयीन पाल्यांना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन केले आहे.
शाळा तसेच कोचिंग क्लासला जाताना अनेक अल्पवयीन मुले दुचाकी वाहने चालविताना निदर्शनास येत आहेत. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविण्यास देणे कायद्याने निषिद्ध आहे. अल्पवयीन मुलांना वाहन देणे हे त्यांच्या तसेच इतर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते.
वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १८ वर्षे पूर्ण असूनही विनापरवाना वाहन चालविल्यास मोटार वाहन कायदा कलम 3(1)/181 अन्वये चालकास तीन महिने तुरुंगवास किंवा ५ हजार रुपये दंड, तसेच वाहन मालकावर कलम 5/180 अन्वये तीन महिने तुरुंगवास किंवा ५ हजार रुपये दंड होऊ शकतो.
तसेच १८ वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविताना आढळल्यास, संबंधित चालक व वाहन मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलाने वाहन चालवून अपराध केल्यास पालक किंवा वाहन मालकाला त्याची जबाबदारी स्वीकारावी लागू शकते. मोटार वाहन कायद्यानुसार अशा प्रकरणात तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास व २५ हजार रुपये दंड होण्याची तरतूद आहे.
दरम्यान, वर्धा जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेकडून पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या अल्पवयीन पाल्यांना कोणत्याही परिस्थितीत वाहन चालविण्यास देऊ नये. तरुण पिढीचे सुरक्षित भविष्य लक्षात घेऊन दि. १६ ऑगस्ट २०२६ पासून अल्पवयीन वाहनचालक व विनापरवाना वाहन चालविणाऱ्यांविरोधात शहरातील विविध ठिकाणी विशेष मोहीम राबवून कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
पालकांनी नियमांचे पालन करून अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यापासून रोखावे, असे आवाहन वर्धा जिल्हा वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक विजय घुले यांनी केले आहे.



