रस्त्याअभावी संगीता गमावली;आता घोडनकप्पीकरांनी डोंगर फोडला!
प्रशासनाच्या उदासीनतेला ग्रामस्थांचा श्रमदानातून थेट सवाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- देशभर स्वातंत्र्यदिनाच्या तयारीची लगबग सुरू असताना, अतिदुर्गम जिवती तालुक्यातील घोडणकप्पी गावात मात्र शासकीय यंत्रणेला आरसा दाखवणारे चित्र पाहायला मिळाले. गेल्या अनेक दशकांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कोलाम बांधवांनी शासनाची वाट न पाहता स्वतःच डोंगर पोखरण्याचा निर्धार केला. दशरथ मांझी यांच्या संघर्षातून प्रेरणा घेत शेकडो ग्रामस्थांनी श्रमदानातून विकासाचा मार्ग तयार करण्यास सुरुवात केली. जागतिक आदिवासी दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झालेला हा उपक्रम केवळ रस्ता तयार करण्याचा प्रयत्न नसून, शासन-प्रशासनाच्या उदासीनतेविरोधातील तीव्र निषेध असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी आणि घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेल्या घोडणकप्पी येथील २५ वर्षीय संगीता तुळशीराम गेडाम या विवाहित महिलेचा १४ जून रोजी प्रसूतीदरम्यान पायवाटेतच मृत्यू झाला. रस्ता नसल्यामुळे तिला वेळेत रुग्णालयात पोहोचवता आले नाही. एका तरुण आईचा रस्त्याअभावी झालेला मृत्यू या दुर्गम भागातील आरोग्यव्यवस्थेची आणि मूलभूत सुविधांच्या अभावाची विदारक वस्तुस्थिती समोर आणणारा ठरला.
या घटनेनंतरही प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्याने हालचाली झाल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. अखेर दिवंगत संगीता गेडाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला.
ग्रामस्थांसह संगीता यांचे पती तुळशीराम गेडाम, गाव पाटील जैतू जुमनाके, भारीचे सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके तसेच गोंदोला समूहाच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. आरोग्य, शिक्षण आणि आदिवासी संस्कृतीच्या जतनासाठी काम करणाऱ्या गोंदोला समूहाने दशरथ मांझी यांच्या प्रेरणेतून डोंगर फोडून रस्ता तयार करण्याचा संकल्प केला. त्यानुसार शेकडो हातांनी श्रमदान करत डोंगर पोखरण्याचे काम सुरू केले.
मूलभूत सुविधांपासून वंचित कोलाम वस्ती
भारी ग्रामपंचायत क्षेत्रातील घोडणकप्पी येथील कोलाम वस्ती आजही रस्ता, पिण्याचे पाणी आणि आरोग्य सुविधांसारख्या मूलभूत गरजांपासून वंचित आहे. डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या या वस्तीपर्यंत शासकीय योजनांचा अपेक्षित लाभ पोहोचला नसल्याची ग्रामस्थांची तक्रार
आहे.
स्वातंत्र्याला ७५ वर्षांहून अधिक काळ उलटून गेला, अनेक योजना राबविण्यात आल्या आणि कोट्यवधींचा निधी खर्च झाल्याचे सांगितले जाते; मात्र घोडणकप्पीसारख्या दुर्गम गावांना आजही मूलभूत रस्त्याची सुविधा मिळत नसल्याचे वास्तव या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.
‘सरकार कधी जागे होणार?’
ग्रामस्थांनी स्वतः डोंगर फोडून रस्ता तयार करण्यास सुरुवात केल्याने शासन-प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संगीता गेडाम यांचा मृत्यू हा केवळ एका कुटुंबाचा दुःखद प्रसंग नसून, दुर्गम आदिवासी भागातील व्यवस्थेच्या अपयशाचे प्रतीक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
“रस्ता, पाणी आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा मिळण्यासाठी आम्हाला स्वतः डोंगर फोडावा लागत असेल, तर शासन-प्रशासन कधी जागे होणार?” असा सवाल घोडणकप्पीतील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
गोंदोला समूहाच्या या अभिनव आणि लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या उपक्रमाचे कौतुक होत असतानाच, शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन घोडणकप्पीला कायमस्वरूपी रस्ता, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
शेकडो हातांनी डोंगर पोखरला आहे; आता शासनाने आपल्या उदासीनतेची भिंत पोखरून घोडणकप्पीपर्यंत विकास पोहोचविण्याची वेळ आली आहे.



