एकोणतीस लाखांचा पांदन रस्ता पहिल्याच पावसात पाण्यात..!
करंजी ग्रामपंचायतच्या ढिसाळ कामावर प्रश्नचिन्ह. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खोब्रागडे यांची जिल्हा प्रशासनाकडे तक्रार.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :- मुख्यमंत्री पांदन रस्ता योजनेअंतर्गत गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी येथे सुमारे २९ लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या दुबागुठा रोड ते चिवंडा रस्ता या एक किलोमीटर रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काम पूर्ण होऊन अवघे सहा महिने होताच पहिल्याच पावसात रस्ता अनेक ठिकाणी तडकला असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
या प्रकरणात काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा तसेच कामात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खोब्रागडे यांनी केला असून त्यांनी याप्रकरणी जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
मुख्यमंत्री पांदन रस्ता योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत हे काम करण्यात आले. मात्र,प्रत्यक्षात काम ग्रामपंचायत सदस्यांनीच केले, असा आरोपही खोब्रागडे यांनी केला आहे.अंदाजपत्रकानुसार आवश्यक प्रमाणात मुरूम, गिट्टी व इतर साहित्याचा वापर करण्यात आला नसल्याने तसेच कामाची गुणवत्ता राखली गेली नसल्यामुळे रस्ता पहिल्याच पावसात खराब झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
याशिवाय रस्त्यालगत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक नालीची व्यवस्था करण्यात आली नसल्याने पाणी रस्त्यावर साचून चिखल निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या मार्गाचा वापर परिसरातील अनेक शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी तसेच शेतीची वाहने आणि गुरेढोरे ने-आण करण्यासाठी करतात.त्यामुळे रस्त्याच्या सद्यस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप व गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
या मार्गावर स्वतःचीही शेती असल्याने शेतीपर्यंत पोहोचणे कठीण झाले असून इतर शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन हा प्रश्न प्रशासनासमोर मांडत असल्याचे प्रदीप खोब्रागडे यांनी स्पष्ट केले. कामाच्या वेळी संबंधित अधिकारी व तांत्रिक अधिकाऱ्यांनी योग्य देखरेख केली नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, रस्त्याच्या नुकसानीचे छायाचित्रे व व्हिडिओ पुराव्यांसह खोब्रागडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून लवकरच इतर शेतकऱ्यांसह चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित यंत्रणेची भूमिका अद्याप समोर आलेली नसून प्रशासनाकडून होणाऱ्या चौकशीकडे गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


