ताज्या घडामोडी

श्रावण महिनाभर बिल्वार्चन व रुद्राभिषेक महापूजा

श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थानचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :- श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान, धाबाच्या वतीने पवित्र श्रावण मासानिमित्त गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ ते बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत महिनाभर बिल्वार्चन व रुद्राभिषेक महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कालावधीत दररोज सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत संत शिरोमणी परमहंस कोंडय्या महाराज यांच्या पवित्र समाधीस्थळावर तसेच शिवलिंग पिंडीवर अभिषेक व बिल्वार्चन करण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्याची सांगता ९ सप्टेंबर २०२६ (बुधवार) रोजी होणार असून, त्या दिवशी प्रथम सामूहिक महापूजा, महाराजांना सहस्त्र बिल्वार्चन आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्थानने सर्व भाविक भक्तांना दररोज होणाऱ्या अभिषेकात सपत्नीक सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच समारोपीय महापूजेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

अभिषेकासाठी इच्छुक भाविकांनी किमान दोन दिवस आधी देवस्थान कार्यालयात नाव नोंदवून आपला दिवस आरक्षित करून घ्यावा, असे संस्थानतर्फे कळविण्यात आले आहे.

संस्थानकडून दररोजच्या अभिषेकासाठी बेलपत्राची व्यवस्था करण्यात येणार असून, दैनंदिन पूजेचे साहित्य भाविकांनी स्वतः सोबत आणावे. तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या भक्तांसाठी देवस्थानच्या भक्तनिवासात निवासाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

श्रावण मासानिमित्त श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान, धाबा तसेच समस्त ग्रामस्थांनी सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देत या धार्मिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये