शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी येथे विद्यार्थी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुड्डेवार
ब्रम्हपुरी :- येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी इंडक्शन प्रोग्राम’चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्र.प्राचार्य डॉ. राजन वानखडे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. राजन वानखडे यांनी यशस्वी जीवनासाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचे महत्त्व अधोरेखित केले. “जिद्द आणि चिकाटी या दोन गुणांच्या बळावर विद्यार्थी आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करून यशाची गगनभरारी घेऊ शकतात,” असे प्रतिपादन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्यविकास आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासावा, असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला संस्थेचे उपप्राचार्य डॉ. आशिष बहेंडवार यांच्यासह विभागप्रमुख प्रा. हर्षदा अकोटकर, प्रा. मीनाक्षी मानलवार, प्रा. संघर्ष पिल्लेवान, प्रा. केमल कोचे, प्रा. नितीन डोरलीकर तसेच कर्मशाळा अधीक्षक प्रशांत खानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सर्व विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांना आपल्या विभागाची माहिती देत विभागातील विविध शैक्षणिक उपक्रम, सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची ओळख करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना संस्थेतील शैक्षणिक वातावरण आणि विविध विभागांच्या कार्यपद्धतीची प्राथमिक माहिती मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंडक्शन प्रोग्रामचे समन्वयक प्रा. नितीन डोरलीकर यांनी केले. डॉ. नितीन पोटे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर प्रा. विकास चव्हाण यांनी आभार मानले. नवीन विद्यार्थ्यांना संस्थेतील शैक्षणिक, तांत्रिक व सहशैक्षणिक वातावरणाशी परिचित करून देण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेला हा इंडक्शन प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरला.



