ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रेरणा महाविद्यालयात टिळकांच्या राष्ट्रवादाचा अन् अण्णाभाऊंच्या लेखनप्रेरणेचा जागर

विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम व सामाजिक समतेचा संदेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच जनतेचे साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालयात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून संयुक्त स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून टिळकांच्या राष्ट्रवादाचा आणि अण्णाभाऊंच्या सामाजिक परिवर्तनवादी लेखनप्रेरणेचा जागर घडवून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक समता आणि संविधानिक मूल्यांची जाणीव जागृत करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून महापुरुषांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

मार्गदर्शन करताना वक्त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रकार्याचा गौरव करत, “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,” हा त्यांचा घोष आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती, शिक्षण आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला लोकचळवळीचे स्वरूप दिले आणि राष्ट्रभावना जागृत केली, असे त्यांनी नमूद केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना वक्त्यांनी सांगितले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत त्यांनी आपल्या साहित्य, पोवाडे, लावण्या आणि शाहिरीच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदना प्रभावीपणे मांडल्या. ‘फकिरा’ या अजरामर कादंबरीसह त्यांच्या साहित्याने सामाजिक समता, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा संदेश दिला. साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले, असेही वक्त्यांनी नमूद केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे, कविता, देशभक्तिपर गीते व पोवाडे सादर करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युगचेतना बहुउद्देशीय ग्रामविकास संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद मुसने होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रमेश राठोड यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे, प्रा. छाया गायकवाड, प्रा. अंजना पवार आणि प्रा. मनीषा मरस्कोल्हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तृप्ती ठाकरे यांनी केले, तर प्रथम पिंपळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थितांनी राष्ट्रनिर्माण, सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार आणि मानवतेची मूल्ये जोपासण्याचा संकल्प केला. मान्यवरांनी अशा प्रेरणादायी कार्यक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला कृतज्ञ अभिवादन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये