घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : वर्धा जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी प्रकाश बबनराव वरखडे वय 22वर्ष (रा. गोंडपुरा, ता. केळझर) याला दोषी ठरवत भारतीय दंड संहिता कलम ४५२, ३५४, ५०४ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८, 12पोस्को अंतर्गत शिक्षा सुनावली आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अन्सारी मॅडम (डी.जे.-३), वर्धा यांनी हा निकाल दिला.
न्यायालयाने सुनावलेली शिक्षा
भा.दं.वि. कलम ४५२ अंतर्गत ३ वर्षे सक्तमजुरी, ₹३,००० दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास.
भा.दं.वि. कलम ३५४ अंतर्गत २ वर्षे सक्तमजुरी, ₹२,००० दंड, दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास.
पोक्सो कायदा कलम ८ अंतर्गत ३ वर्षे सक्तमजुरी, ₹३,००० दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास.
घटनेचा तपशील फिर्यादीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना आरोपी घरात अनधिकृतपणे शिरला. पिण्याच्या पाण्याचा बहाणा करून त्याने मुलीला जवळ बोलावले आणि तिच्यावर अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध करत आरोपीला लाथ मारून घराबाहेर पळ काढला व आजूबाजूच्या नागरिकांना प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक वानखेडे यांनी केला. न्यायालयात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री. प्रसाद सोईतकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तसेच पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे यांनी साक्षीदारांना वेळोवेळी मार्गदर्शन करून न्यायालयीन प्रक्रिया सक्षमपणे पार पाडण्यास सहकार्य केले.
ही माहिती पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.



