वर्धा शहरात गावठी महुआ दारूभट्टीवर डी. बी. पथकची प्रो. रेड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा शहर पोलिसांनी दारूबंदीविरोधी मोहिमेत मोठी कारवाई करत गावठी महुआ दारू तयार करणाऱ्या ठिकाणी छापा टाकून २ लाख २७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा शहर पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इतवारा बाजार परिसरातील पारधी बेडा येथे छापा टाकण्यात आला.
यावेळी एका मोकळ्या जागेवर गावठी महुआ दारू तयार करण्यासाठी लावलेली भट्टी आढळून आली. पोलिसांनी पंचांसमक्ष पाहणी केली असता घटनास्थळावरून एकूण २,२७,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेला साठा नष्ट करण्यात आला.
या प्रकरणी रुक्साना शेख जमील शेख (वय ५६, रा. इतवारा बाजार, वर्धा) हिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (बी), (सी), (एफ), (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली, वर्धा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागेशकुमार चातरकर यांच्या निर्देशानुसार दारूबंदी पथकाचे पोलीस हवालदार सुहास चांदोरे, सहकारी पोलीस हवालदार सचिन भाराशंकर, पोलीस अंमलदार मनोज काक पुरे, नवनीत वानखेडे, उमेश कंभरे तसेच महिला पोलीस अंमलदार करिश्मा परचाके यांनी केली.



