डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजप महानगरतर्फे विनम्र अभिवादन.

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न, प्रख्यात शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून संपूर्ण जगभर ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने गांधी चौक येथील भाजप महानगर कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. कलाम यांच्या राष्ट्रभक्ती, साधेपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, शिक्षणाविषयीची तळमळ आणि युवा पिढीला दिलेल्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण केले. “स्वप्ने ती नसतात जी झोपेत पडतात, स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत,” हा त्यांचा प्रेरणादायी संदेश आजही देशातील प्रत्येक युवकाला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती साकार करण्यासाठी अथक परिश्रम करण्याची प्रेरणा देत असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले.
डॉ. अब्दुल कलाम यांनी विज्ञान, संरक्षण संशोधन आणि राष्ट्रनिर्मितीच्या क्षेत्रात दिलेले अमूल्य योगदान देशासाठी सदैव प्रेरणादायी राहील. राष्ट्र प्रथम ही भावना जोपासत त्यांनी भारताला आत्मनिर्भर, वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पाहिले. त्यांच्या विचारांचा वारसा प्रत्येक भारतीयाने कृतीतून जपण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या अभिवादन कार्यक्रमास जिल्हा महामंत्री सविता दंढारे, विधानसभा प्रमुख तथा महिला मोर्चा जिल्हा प्रभारी वंदना हातगावकर, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष राशीद हुसेन, अमोल शेंडे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष विमल काटकर, नीलिमा वनकर, करण बैस, ईश्वर वाघमारे, देवा कुंटा, शालू कन्नोजवार, अफीसा पठाण, दुर्गा वैरागडे, रिना साखरकर, सोनाली इटनकर, भाग्यश्री येरणे, मनीषा पडगेलवार, भावना बरसागडे, हर्षदा गर्गेलवार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळत त्यांना आदरांजली वाहिली. तसेच त्यांच्या आदर्शांवर चालत राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी आपले योगदान देण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरतर्फे आयोजित हा अभिवादन व माल्यार्पण कार्यक्रम अत्यंत श्रद्धापूर्वक आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.



