ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे जीवन म्हणजे जनसेवा, संघर्ष, समर्पण आणि जनविश्वासाचा अजरामर आदर्श – आ. मुनगंटीवार

चंद्रपुरात लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे चौकातील भिंतीचित्र व सुशोभीकरणाचे आ.मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण; वंजारी सेवा समितीच्या मागणीला मिळाले मूर्त स्वरूप

चांदा ब्लास्ट

सत्तेपेक्षा जनतेच्या हृदयात स्थान मिळविणारे नेते म्हणजे गोपीनाथराव मुंडे

चंद्रपूर :- लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे जीवन म्हणजे जनसेवा, संघर्ष, समर्पण आणि जनविश्वासाचा अजरामर आदर्श आहे. त्यांनी सत्तेचे राजकारण केले नाही, तर जनतेच्या विश्वासावर उभे राहून समाजकारणाचा नवा इतिहास घडविला. त्यांच्या विचारांचे हे भिंतीचित्र म्हणजे केवळ एका महान नेत्याला वाहिलेली श्रद्धांजली नसून, जनतेसाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा देणारा चिरंतन संदेश आहे, असे भावनिक प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर शहरातील लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे चौकात साकारण्यात आलेल्या भिंतचित्राचे आणि परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या विविध भागांतून वंजारी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंजारी सेवा समितीच्या मागणीला पूर्णत्वास गेल्याचा आनंद व्यक्त करताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, डिसेंबर २०२३ मध्ये श्री अनिल कहाळे यांच्या नेतृत्वाखाली समितीचे शिष्टमंडळ भेटले होते. त्यानंतर तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन १९ डिसेंबर २०२३ रोजी सुमारे ८.४३ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. अवघ्या तीन महिन्यांत कार्यारंभ आदेश देऊन आवश्यक निधी वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात आला आणि आज हे काम पूर्णत्वास आले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, विशेषतः मराठवाड्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या वंजारी समाजबांधवांचे स्वागत करताना आ.मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर ही वाघाची भूमी आहे आणि वाघासारखे धाडसी हृदय असलेले समाजबांधव आज येथे एकत्र आले आहेत. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा कार्यकर्ता म्हणून या सर्वांचे स्वागत करताना मला विशेष आनंद होत आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या राजकीय प्रवासाला उजाळा देताना आ. मुनगंटीवार म्हणाले, १९८६ मध्ये अवघ्या ३६ व्या वर्षी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील पहिली शेतकरी संघर्ष यात्रा चंद्रपूर येथील काळाराम मंदिरापासून सुरू झाली. माता महाकालीचे दर्शन घेऊन त्यांनी या ऐतिहासिक यात्रेला प्रारंभ केला. त्यामुळे संघर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे गोपीनाथराव मुंडे, असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

विधानसभेतील त्यांच्या प्रभावी नेतृत्वाच्या आठवणी सांगताना आ. मुनगंटीवार म्हणाले, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे भाषण हे केवळ भाषण नसायचे, तर शेतकरी, कष्टकरी, ओबीसी समाज आणि सर्वसामान्य जनतेशी साधलेला थेट संवाद असायचा. ते उभे राहिले की मुख्यमंत्रीदेखील त्यांचे भाषण ऐकण्यासाठी सभागृहात उपस्थित राहत असत. कारण ते सत्तेचा आवाज नव्हते, तर जनतेचा आवाज होते.

आपल्या राजकीय प्रवासातील एक भावनिक प्रसंग सांगताना त्यांनी नमूद केले की, माझ्यावर दोन नेत्यांचे मोठे ऋण आहे. एक केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि दुसरे लोकनेते गोपीनाथराव मुंडे. १९९५ मध्ये आमदार झाल्यानंतर बल्लारपूरला तालुक्याचा दर्जा मिळवून देण्याची प्रतिज्ञा केली होती.१३ मे १९९९ मध्ये गोपीनाथराव मुंडे यांनी स्वतः पुढाकार घेत मंत्रिमंडळात बल्लारपूर तालुका निर्मितीचा निर्णय करून घेतला. तो निर्णय झाला नसता, तर मला सात वेळा जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नसती,” असे ते भावूक होऊन म्हणाले.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे शरीराने आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांचा वारसा आजही लाखो कार्यकर्त्यांच्या कृतीत जिवंत असल्याचे सांगत आ. मुनगंटीवार म्हणाले की, त्यांनी पदासाठी नव्हे तर जनतेच्या हृदयावर राज्य करण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांचे संपूर्ण जीवन समाजातील रंजल्या-गांजल्यांच्या सेवेसाठी वाहिले गेले. म्हणूनच ते आजही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातील प्रेरणास्थान आहेत.

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील आजच्या बळकटीमागे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षाचा भक्कम पाया असल्याचे आ.मुनगंटीवार नमूद केले.महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या वंजारी समाजाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांचे आभार मानत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी माता महाकालीच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारांचा दीप समाजसेवेच्या प्रत्येक वाटेवर अखंड प्रज्वलित राहिला पाहिजे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,असे आवाहन त्यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये