ताडाळी इंडियन ऑईल डेपो परिसरातील कथित डिझेल चोरी व अवैध इंधन व्यवसायाची चौकशी करण्याची मागणी;

चंद्रपूर, दि. १३ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी येथील इंडियन ऑईल डेपो परिसरात कथित डिझेल चोरी, अवैध साठवणूक व विक्री तसेच वाढत्या गुंडगर्दी आणि दहशतीच्या प्रकारांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे तसेच कामगार नेते, कृषी उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूरचे माजी सभापती तथा संचालक आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिनेश दादापाटील चोखारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, ताडाळी येथील इंडियन ऑईल डेपो परिसरात गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात डिझेल चोरी होत असल्याची माहिती समोर येत आहे. या कथित बेकायदेशीर प्रकारांमुळे शासनाच्या महसुलाचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, सार्वजनिक संपत्तीचेही नुकसान होत असल्याची बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
तसेच काही व्यक्ती व टोळ्या संगनमताने इंधन टँकरमधून डिझेलची चोरी करून त्याची अवैध साठवणूक व विक्री करत असल्याची माहिती मिळत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्ती, वाहनधारक, मध्यस्थ तसेच इतर सहभागी घटकांचा सहभाग असण्याची शक्यता असल्याने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, या कथित अवैध व्यवसायाला विरोध करणाऱ्यांना धमकावणे, परिसरात दहशत निर्माण करणे, गुंडगर्दी करणे तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे प्रकार वाढत असल्याची माहितीही निवेदनातून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यात यावी, अशी अपेक्षाही दिनेश दादापाटील चोखारे यांनी व्यक्त केली आहे.



