ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर जिल्हाबंदीची मागणी

शिकलगर समाजाने पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांना दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरातील शिकलगर समाजाच्या वतीने काही कथित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करून त्यांना जिल्हाबंदी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांना देण्यात आले. समाजातील नागरिकांच्या उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, देऊळगाव राजा शहरात शिकलकरी समाज अनेक वर्षांपासून शांततेने वास्तव्यास असून आपला वराह व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. समाजातील बहुतांश नागरिक कायद्याचे पालन करणारे आणि सामाजिक सलोखा जपणारे आहेत. मात्र काही व्यक्तींच्या कथित बेकायदेशीर कृत्यांमुळे संपूर्ण समाजाला बदनामी व त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

समाजाच्या प्रतिनिधींनी निवेदनाद्वारे संबंधित व्यक्तींवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचा दावा केला आहे. चोरी, घरफोडी, दादागिरी, मारहाण तसेच समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय काही व्यक्ती बाहेरील गुन्हेगारांशी संबंध ठेवून परिसरातील चोरीच्या घटनांना मदत करीत असल्याचाही आरोप समाजबांधवांनी केला आहे. त्यामुळे महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण संशय आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

संबंधित व्यक्तींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची सखोल चौकशी करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार जिल्हाबंदीची कारवाई करावी तसेच भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी निवेदन स्वीकारून प्रकरणाची कायदेशीर चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती समाजाच्या प्रतिनिधींनी दिली.

यावेळी शिकलकरी समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी, युवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काहींच्या कृत्यांमुळे संपूर्ण समाज बदनाम होत आहे व तसेच

शांततेत जीवन जगणाऱ्या शिकलकरी समाजातील बहुसंख्य नागरिकांची प्रतिमा काही कथित गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे मलीन होत असल्याची खंत समाजबांधवांनी व्यक्त केली. समाजातील शांतता आणि सुरक्षिततेसाठी कठोर कारवाई होणे म्हणून मागणी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

पापासिंग बावरे माजी नगर सेवक देऊळगाव राजा

“संबंधित व्यक्तीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची सखोल पडताळणी करून नियमानुसार तडीपारची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन ठाणेदार यांनी दिले. वारंवार होणाऱ्या तक्रारी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले तसेच संबंधित व्यक्तीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी सुरू असून, नियमांनुसार तडीपार प्रस्ताव सादर करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या घटकांवर कोणतीही दया दाखविली जाणार नाही.

ब्रह्मगिरी ठाणेदार देऊळगाव राजा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये