सावळापूर येथे गावठी मोहाची दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा
१.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
आर्वी : जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष दारूबंदी मोहिमेअंतर्गत आर्वी उपविभागातील सावळापूर येथे मोठी कारवाई करण्यात आली. दि. १९ जून २०२६ रोजी दारूबंदी पथकाने सावळापूर गावात छापा टाकून गावठी मोहाची दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले.
या कारवाईत पद्मा कांचन सुग्र वाल (वय ५२, रा. सावळापूर) यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून पाच प्लास्टिक ड्रममध्ये साठवून ठेवलेले सुमारे ७५० लिटर गावठी मोहाचे सडवा रसायन तसेच इतर भट्टी साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे १ लाख ६७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीस ताब्यात घेऊन आर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक वर्धा सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी पथक आर्वी उपविभागाचे सपोनि पद्माकर मुंडे, पोउपनि कलेश मगरे, पो. हवालदार राजेश पाचरे (ब. नं. १४७८), पोलीस शिपाई प्रतीक नगराळे (ब. नं. २०३), महिला पोलीस शिपाई शिल्पा राजूत (ब. नं. १४७६) तसेच चालक पोलीस शिपाई सुरज भाणगे (ब. नं. ४९१) यांनी पार पाडली.



