खापरी गावात ४ फूट लांबीच्या विषारी नागाला सर्प मित्र पप्पू कांबळे याने दिले जीवदान
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेलू तालुक्यातील खापरी येथे एका घरात शिरलेल्या सुमारे ४ फूट लांबीच्या विषारी नागाला सुरक्षितरीत्या पकडून जीवदान देण्यात आले. या घटनेमुळे गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, खापरी येथील मोरेश्वर वासकर यांच्या घरी रात्री कुटुंबीय जेवण आटोपून झोपेची तयारी करत असताना सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या मुलाने घराबाहेर येताच दरवाजाजवळ मोठा नाग पाहिला. नागाने मुलावर झेप घेण्याचा प्रयत्न केल्याने त्याने आरडाओरडा केला. त्यानंतर कुटुंबीय बाहेर आले असता त्यांना मोठा विषारी नाग दिसून आला.
नाग घरात शिरून गॅस सिलेंडर व शेगडीखाली जाऊन बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी गावातील योगेश चापडे यांनी तत्काळ सेलू येथील सर्पमित्र पप्पू कांबळे यांना फोनद्वारे माहिती दिली.
माहिती मिळताच पप्पू कांबळे यांनी कोणताही विलंब न करता खापरी गाव गाठले. त्यांनी अत्यंत कौशल्याने नागाला सुरक्षित पकडून आपल्या ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना सापांबाबत जनजागृती करत साप आढळल्यास घाबरून न जाता त्याला इजा न करता तज्ज्ञांना संपर्क करण्याचे आवाहन केले.
या धाडसी आणि तत्पर कार्याबद्दल ग्रामस्थांनी सर्पमित्र पप्पू कांबळे व योगेश चापडे यांचे आभार मानले. सर्पमित्रांच्या या कार्यामुळे एका विषारी नागाचे प्राण वाचले तसेच संभाव्य अनर्थ टळला.



