ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

योजना तीन, पाणी मिळेना दोन घोट! 

तळोधीत महिनाभरापासून पाणीटंचाई : टँकरद्वारे करावा लागत आहे पाणी पुरवठा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :- कोरपना तालुक्यातील तळोधी गावात गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड वणवण करावी लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे गावातील विहिरी, बोअरवेल आणि पारंपारिक जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत. गावात कागदावर तब्बल तीन-तीन नळ योजना अस्तित्वात असतानाही, प्रत्यक्षात मात्र ग्रामस्थांना थेंब-थेंब पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. प्रशासकीय अनास्थेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांमध्ये आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तीन नळ योजना ठरल्या पांढरा हत्ती!

विशेष म्हणजे तळोधी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी यासाठी प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. गावात सद्यस्थितीत खालील तीन मोठ्या योजना कार्यरत असणे अपेक्षित आहे.

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशन अंतर्गत उभारलेली नवीन योजना, व अल्ट्राटेक कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध केलेली पाणीपुरवठा व्यवस्था नियोजनाचा अभावी तिन्ही योजना सध्या पूर्णपणे ठप्प आहेत. त्यामुळे या योजनांवर झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला असून, त्यांच्या अंमलबजावणीवरच आता नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

महिलांची पाण्यासाठी वणवण; दिनक्रम विस्कळीत.

सध्या गावात एक दिवसाआड टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, हा पुरवठा अत्यंत अनियंत्रित आहे. टँकर वेळेवर न येने, किंवा अनेकदा दोन ते तीन दिवस टँकरच न येणे यामुळे नागरिकांना पाण्यासाठी तासन्तास वाट पाहावी लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांचा दैनंदिन दिनक्रम पूर्णपणे कोलमडला आहे. उपलब्ध पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे लागत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी.

तळोधीत दरवर्षी उन्हाळ्यात काही प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवते, पण यंदा महिनाभरापासून सुरू असलेल्या या गंभीर समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार स्थानिक प्रशासनाकडे दाद मागूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यंत्रणांच्या या ढिसाळ कारभारामुळे गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

“दरवर्षी उन्हाळ्यात गावात पाणीटंचाई असते, पण यंदा परिस्थिती गंभीर झाली आहे.वारंवार तक्रारी करूनही प्रशासन केवळ तात्पुरती मलमपट्टी करते. आम्हाला कायमस्वरूपी पाणी व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

(अल्ट्राटेक प्रशासनाकडून सध्याचा घडीला एक दिवसा आड टँकरने पाणी पुरवठा करणे सुरू आहे. जलस्त्रोत वाढ होत नाही तोपर्यंत पुढील काही दिवस टँकरने पाणी पुरवठा सुरूच राहील :- संजय तुरारे ग्रामविकास अधिकारी तळोधी)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये