हिवरा तांडा येथे अवैध मोहा दारू निर्मितीवर आर्वी पोलिसांची धाड
6.40 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष दारूबंदी मोहिमेअंतर्गत आर्वी उपविभागातील हिवरा तांडा शिवारात मोठी कारवाई करत अवैध मोहा दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत सुमारे 6 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 16 जून 2026 रोजी आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरा तांडा येथील आरोपी नारायण जाधव यांच्या शेतामध्ये दारूबंदी पथकाने छापा टाकला. यावेळी तेथे अवैधरित्या मोहा दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले 15 लोखंडी ड्रममध्ये सुमारे 3000 लिटर मोहा रसायन सडवा तसेच गाळण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 6 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल , अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी पथक आर्वी उपविभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पद्माकर मुंडे, पोलिस उपनिरीक्षक कल्पेश मगरे, पोहवा राजेश पाचरे (ब.नं. 1478), पोशि प्रतिक नगराळे (ब.नं. 203), मपोशि शिल्पा राऊत (ब.नं. 1476) तसेच चालक पोशि सुरज भांनगे (ब.नं. 491) यांनी संयुक्तरित्या पार पाडली.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून जिल्ह्यातील दारूबंदी मोहिमेला अधिक गती मिळाली आहे.



