ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्जाची रक्कम बचत गटांच्या महिलांच्या खात्यात थेट जमा करा

माविमच्या क्रेडीट प्लॉन सेमिनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना निर्देश

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) बचत गटांना बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सदर बचत गटाच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा झाल्यावर ती काढून महिलांना रोखे स्वरुपात देण्यात येते. मात्र तसे न करता बचत गटाच्या महिलांच्याच खात्यात कर्जाची रक्कम थेट जमा करावी, जेणेकरून कर्ज वितरणात अधिक पारदर्शकता येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी बँकांना दिले.

नियोजन सभागृह येथे आज (दि. १५) तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत आयोजित क्रेडीट प्लॉन सेमिनारमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक शेखर सोनुने, माविमचे विभागीय सल्लागार राजू इंगळे, विभागीय उपजीविका सल्लागार अमित गाढे, जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, विविध बँकांचे प्रतिनिधी, लोकसंचालित साधन केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, महिला बचत गटाला कर्ज मंजूर झाल्यानंतर, बँकेतील रक्कम रोख स्वरूपात काढून गावात महिलांना वाटप केली जाते. परंतु २०२६ -२७ पासून माविमद्वारे ही पद्धत बंद करण्यात येत आहे. त्यामुळे महिलांना रोख रक्कम न देता बँकांनी आरटीजीएस किंवा धनादेशाद्वारे रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करावी. याबाबत जिल्हा अग्रणी बँकेने संबंधित सर्व बँकांना सूचना द्याव्यात. तसेच बचत गटाला कर्ज देताना बँक हप्ते पाडून देत नाही. त्यामुळे अनेकदा बचत गटांची अडचण होते. याबाबत सुद्धा अग्रणी बँकेने त्वरित कार्यवाही करावी. बँकांनी बचत गटाचे पासबुक अपडेट करून देऊन स्टेटमेंट सुद्धा उपलब्ध करून द्यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.

सन २०२६-२७ मध्ये जिल्ह्यातील १५९९ महिला बचत गटांना ५४.५५ कोटी रुपयांचे बॅक कर्ज उपलब्ध करून देण्याचा क्रेडिट प्लॅन तयार करण्यात आल्याचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये