दुचाकीची उभ्या ट्रकला धडक, एकाचा मृत्यू
राजुरा तालुक्यातील कापणगाव जवळील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
राजुरा आठवडी बाजारातून भाजीपाला घेऊन घरी परत जात असताना, कापनगाव गावाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीस्वार विकास देवराव मोरे (३५ वर्षे ) याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार (दि. १३) रोजी रात्री ८.०० वाजेदरम्यान घडली.
मृतक विकास देवराव मोरे हा मूळचा गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील रहिवासी असून, तो मागील सहा वर्षांपासून राजुरा तालुक्यातील आर्वी येथे सासुरवाडीला राहून शेती करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी त्याने स्वतःची बैलजोडी विकून रक्कम घरी दिली आणि आठवडी बाजारातून भाजीपाला विकत घेण्यासाठी राजुराला आला. भाजीपाला घेऊन घरी परत जात असताना, रात्री आठ वाजताच्या सुमारास कापणगाव गावाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक दिली आणि खाली पडून गंभीर जखमी झाला.
जखमी अवस्थेत त्याला राजुरा येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी करून डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले.
राजुरा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.



