ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्याला मिळणार आता 65 गुणवंत केंद्रप्रमुख

प्रक्रिया अंतिम टप्प्यात; उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

बुलढाणा जिल्ह्यातील शैक्षणिक व्यवस्थेला बळकटी देणारी महत्त्वाची घडामोड सध्या जिल्हा परिषदेत घडत असून, केंद्रप्रमुख पदाच्या नियुक्ती प्रक्रियेला अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे. स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करून यश मिळविणाऱ्या 65 उमेदवारांची केंद्रप्रमुख पदासाठी निवड झाली असून, लवकरच त्यांच्या नियुक्त्या होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, निवड झालेल्या उमेदवारांमध्ये उच्च शैक्षणिक पात्रता आणि उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी असलेल्या शिक्षकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. यामध्ये पीएच.डी.धारक, नेट उत्तीर्ण, सेट उत्तीर्ण, पीएच.डी. संशोधन फेलो तसेच राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित शिक्षक यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आयबीपीएस या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या मदतीने केंद्रप्रमुख पदासाठी स्पर्धापरीक्षेचे ऑनलाइन आयोजन केले होते. त्याचा निकाल जाहीर झाला असून, आयबीपीएस द्वारा गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ही गुणवत्ता यादी आयबीपीएसने परीक्षा परिषदेला व परीक्षा परिषदेने शिक्षण संचालकांना यादी पाठविली आहे.

शिक्षण संचालकांनी जिल्हानिहाय गुणवत्ता याद्या संबंधित ३४ जिल्हा परिषदांना पाठविल्या आहेत. बुलढाणा जिल्हा परिषदेला शिक्षण संचालकांकडून यादी प्राप्त झाली असून, त्यापैकी एकास अडीच या प्रमाणात सुमारे 160-165 शिक्षकांच्या कागदपत्र पडताळणी करण्यात आली आहे. योग्य कागदपत्रे, अनुभव आणि पात्रता असणाऱ्या पात्र शिक्षकांची यादी तयार करण्याचे काम बुलढाणा जिल्हा परिषदेत अंतिम टप्प्यात आहे. त्यापैकी टॉप 65 शिक्षकांना केंद्रप्रमुख म्हणून समुपदेशनाद्वारे नियुक्ती दिली जाणार आहे. *यात तीन जागा दिव्यांगांसाठी तर पाच जागा उर्दू माध्यम शिक्षक बांधवांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

*शिक्षकांवरील प्रभाराचा ताण होणार कमी*

जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची पदे रिक्त असल्याने शिक्षकांना प्रभार देण्यात आला होता. त्यामुळे त्यांना केंद्रप्रमुख म्हणूनही काम करावे लागत होते. केंद्रप्रमुखांची पदे भरण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होती. अखेर राज्य परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 65 उमेदवारांची केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे प्रभाराचा ताण आता कमी होणार आहे. तसेच रिक्त झालेल्या 65 जागा लगेच पवित्र पोर्टल मार्फत भरण्याचे नियोजन शिक्षणमंत्री मा.दादाजी भुसे यांच्या नेतृत्वात शिक्षण विभागाने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये