वर्धा पोलीस दलातर्फे ‘संडे ऑन सायकल’ (Sunday On Cycle) उपक्रमाचे यशस्वी आयोजन
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज, रविवार दिनांक १४ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ६.०० वाजता ‘संडे ऑन सायकल’ (Sunday On Cycle) या विशेष सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. पोलीस मुख्यालय, वर्धा येथून या रॅलीचा शानदार शुभारंभ झाला.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि तंदुरुस्तीबाबत (Fitness) जागरूकता निर्माण करणे हा आहे वर्धा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः पांढऱ्या गणवेशात उपस्थित राहून सर्व सायकलस्वारांचा उत्साह वाढवला. यामध्ये प्रामुख्याने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विलास पाटील आणि राखीव पोलीस निरीक्षक, वर्धा उपस्थित होते. नागरिकांचा प्रतिसाद या रॅलीमध्ये वर्धा शहरातील विविध सायकलिंग क्लबचे सदस्य, तरुण, अबालवृद्ध आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने रंगीबेरंगी सायकलिंग जसीं व हेल्मेट परिधान करून सहभाग घेतला. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सायकल चालवा” हा संदेश देत ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली.
रॅलीच्या समारोपप्रसंगी सहभागी सायकलपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी कल्याण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (स.पो.नि.) आशिष चिलांगे यांनी विशेष परिश्रम घेतले.
पोलीस प्रशासनातर्फे सहभागी झालेल्या सर्व सायकलप्रेमींचे आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले असून, भविष्यातही आरोग्याला पूरक असणाऱ्या अशा सामाजिक व कौतुकास्पद उपक्रमांना वर्धा पोलीस दलातर्फे नेहमीच
प्रोत्साहन दिले जाईल, असे या प्रसंगी स्पष्ट करण्यात आले.



