भद्रावतीच्या सुवर्णकन्येचे जल्लोषात स्वागत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावतीची सुवर्णकन्या डॉ. पूजा ऊर्फ ज्योती देवराव देऊळकर हिने गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे आयोजित जागतिक योगासन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत ३५ ते ४५ वयोगटात सुवर्णपदक पटकावून भद्रावतीसह देशाची मान उंचावली. या ऐतिहासिक यशानिमित्त भद्रावती शहरात तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
दि. ११ जून रोजी डॉ. पूजा देऊळकर यांचे स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार येथे आगमन होताच श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार समिती, श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि अष्टांग योगासन भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वागत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
या मिरवणुकीत गुरुदेव भक्त, चिमुकले, पत्रकार, व्यापारी, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, भजनी मंडळे तसेच असंख्य महिला-पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
राजकीय व धार्मिक मिरवणुका भद्रावतीकरांसाठी नवीन नसल्या तरी क्रीडा क्षेत्रातील जागतिक यशासाठी प्रथमच इतक्या भव्य स्वरूपात काढण्यात आलेली ही विजय मिरवणूक विशेष ठरली. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि गुरुदेव भक्तांचे शिस्तबद्ध नियोजन यामुळे कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली.
मूळचे मांगली येथील रहिवासी असलेल्या देऊळकर कुटुंबाने कन्येच्या उपचारासाठी व प्रशिक्षणासाठी मोठा संघर्ष केला. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि आरोग्याच्या समस्यांवर मात करत डॉ. पूजाने अविरत परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर योगासन क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक यश संपादन केले आहे.
प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सातत्याने साधना करत तिने जागतिक स्तरावरील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून देशाचा गौरव वाढविला. तिच्या या अभूतपूर्व यशाचा आनंद साजरा करत शहरभर ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी आणि ढोल-ताशांच्या गजराने वातावरण भारावून गेले.
श्री स्वामी भद्रनाग मंदिर परिसरात आयोजित समारोपीय कार्यक्रमाने मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी उपस्थितांनी डॉ. पूजा देऊळकर यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



