आर्थिक साक्षरतेतून सुरक्षित भविष्य: सीए जगदीश चांडक यांनी वर्धा पोलीस दलाला केले आर्थिक गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे अहोरात्र कर्तव्य बजावत असताना अनेकदा त्यांना स्वतःच्या व कुटुंबाच्या आर्थिक नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. हीच बाब विचारात घेऊन, पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, वर्धा पोलीस मुख्यालया येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी “आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक नियोजन” या विषयावर एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत वर्धा येथील प्रसिद्ध सनदी लेखापाल (Chartered Accountant) श्री. जगदीश चांडक यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून पोलीस दलातील सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले.
CA श्री जगदीश चांडक यांनी भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी केवळ बचत न करता, तिची योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे का गरजेचे आहे, हे सोप्या भाषेत पटवून दिले.विविध गुंतवणूक पर्याय: त्यांनी शेअर बाजार (Stock Market), म्युच्युअल फंड (Mutual Funds), पीपीएफ (PPF), राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि इतर शासकीय योजनांमधील गुंतवणुकीच्या संधी व त्यामधील जोखीम व्यवस्थापन यावर सविस्तर प्रकाश टाकला.आर्थिक फसवणुकीपासून सावधानता: सध्या वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करत, जादा परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या फसव्या व अनधिकृत योजनांपासून स्वतःला आणि समाजाला कसे दूर ठेवावे, याबाबत त्यांनी तांत्रिक व कायदेशीर मुद्दे समजावून सांगितले.निवृत्तीनंतरचे नियोजन: सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि चिंतामुक्त कशा प्रकारे जगता येईल, याचे गणित त्यांनी विविध उदाहरणांद्वारे मांडले. “पोलीस दलातील अंमलदार व अधिकारी अत्यंत तणावाखाली आणि व्यस्त वेळापत्रकात काम करत असतात. अशा वेळी त्यांच्या कष्टाच्या पैशांचे योग्य नियोजन व्हावे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित राहावे, हाच या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.”
या कार्यशाळेला वर्धा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, मुख्यालयातील अधिकारी आणि मोठ्या संख्येने पोलीस अंमलदार उपस्थित होते. कार्यशाळेच्या शेवटी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या शंकांचे सीए जगदीश चांडक यांच्याकडून निरसन करून घेतले.अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण मार्गदर्शनाबद्दल वर्धा पोलीस दलाच्या वतीने सीए जगदीश चांडक यांचे आभार मानण्यात आले.


