पर्यावरण संवर्धनासाठी जीएमआर वरोरा एनर्जीची वृक्षारोपण मोहीम
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५०० रोपांची लागवड; कर्मचाऱ्यांनाही घरगुती वृक्षसंवर्धनासाठी प्रोत्साहन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी.
राजेंद्र मर्दाने, वरोरा
पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाबाबतची आपली बांधिलकी अधोरेखित करत जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड (GWEL) तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रकल्प परिसरात भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत सुमारे ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
जीएमआर कंपनीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (थर्मल) धनंजय देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोहिमेत अधिकारी, कर्मचारी आणि सहयोगी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रकल्प परिसर हरित करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कर्मचाऱ्यांना घरगुती स्तरावर वृक्षलागवड करण्यासाठी प्रत्येकी दोन रोपांचे वितरणही करण्यात आले.
कंपनीने आतापर्यंत १ लाख २५ हजारांहून अधिक वृक्षांची लागवड केली असून त्यामुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल राखण्यास आणि जैवविविधता वृद्धिंगत करण्यास मोठी मदत झाली आहे. विविध शाश्वत उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी कंपनी सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना धनंजय देशपांडे म्हणाले, “पर्यावरणाबाबतची जबाबदारी ही केवळ कार्यस्थळापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. जीडब्ल्यूईएलमध्ये आम्ही शाश्वततेकडे दीर्घकालीन जबाबदारी म्हणून पाहतो. औद्योगिक प्रगती आणि पर्यावरण संवर्धन यांच्यात समतोल साधणारी परिसंस्था निर्माण करणे ही आमची दृष्टी आहे.”
ते पुढे म्हणाले, “ पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांना चालना देणे, संसाधनांचे जतन करणे, शाश्वत कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे आणि भावी पिढ्यांसाठी अधिक स्वच्छ, हरित व सक्षम भविष्य घडविणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
या वृक्षारोपण मोहिमेद्वारे पर्यावरण संरक्षणासाठी उद्योग, कर्मचारी आणि समाज यांच्यातील सहभाग अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात स्वागत करण्यात येत आहे.



