अवैध दारूच्या ७ भट्टया उद्ध्वस्त करून १८.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त; झडतीदरम्यान एक मोठा चाकू हस्तगत!
वर्धा पोलिसांची 'शिख बेडा' येथे धडक 'वॉशआउट मोहीम'

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे पोलीस ठाणे सावंगी (मेघे) हद्दीतील ‘शिख बेडा’ परिसरात अवैध धंदे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगले जात असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कडक जरब बसवण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) वर्धा, पो. स्टे, सावंगी (मेघे) व दंगल नियंत्रण पथकाला संयुक्त सर्चिग ऑपरेशन व ‘वॉशआउट मोहीम’ राबवण्याचे संबंधाने आदेश दिले होते.
पोलिस अधीक्षक, वर्धा यांच्या आदेशान्वये आज दिनांक ०८/०६/२०२६ रोजी पहाटे ०४:०० वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, पो. स्टे. सावंगी (मेघे) आणि दंगल नियंत्रण पथकाने शिख बेडा येथील संशयास्पद इसमांच्या घरांची व परिसराची पंचांसमक्ष कायदेशीररीत्या झडती (Searching Operation) घेण्यास सुरुवात केली. या धडक मोहिमेदरम्यान गावठी मोहा दारू गाळण्याच्या भट्टयांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. दारूबंदी कायद्यान्वये एकूण ०७ गुन्हे (केसेस) नोंदवून ७ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण १८,४२,८००/- रुपये (अठरा लाख बेचाळीस हजार आठशे रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त साठ्यातून रासायनिक परीक्षणासाठी आवश्यक सॅम्पल घेण्यात आले असून, उर्वरित सर्व मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला आहे.
संशयितांच्या घराची झडती घेत असताना एका घरातून एक एक मोठा चाकू मिळून आला, पोलिसांनी तो जप्त करून आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये (Arms Act) स्वतंत्र गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तः या संपूर्ण ‘ऑपरेशन वॉशआउट’ मोहिमेसाठी ०७ पोलीस अधिकारी, ५० अंमलदार व दंगल नियंत्रण पथक असे एकूण ७७ अधिकारी व अंमलदार तैनात करण्यात आले होते. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवलेल्या या मोहिमेमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मार्गदर्शक व कामगिरी करणारे अधिकारीः सदर यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, सावंगी (मेघे) चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद गिरी, एलसीबी व सावंगी पोलीस ठाण्याचे अंमलदार आणि दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांनी चोखपणे बजावली,
मा. पोलीस अधीक्षकांचा इशारा: “वर्धा जिल्हा कार्यक्षेत्रात अवैध धंदे, अमली पदार्थ आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांची गय केली जाणार नाही. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या सर्चिग मोहिमा (Operation) अविरतपणे सुरू राहतील.”



