विजेच्या सतत लपंडावामुळे गोजोलीकर हैराण
परिसरातील गावांमध्ये अचानक बिजली गायब ; महावितरण विभागाने लक्ष देण्याची गरज

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले असून सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित राहत असल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोजोली मक्ता, चेक गोजोली, दुबारपेठ, चेक दुबारपेठ, चिवंडा, मोहाहेटी सह परिसरातील गावांमध्ये वीज खंडित होत असल्याने भर उन्हाळ्यात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारची जाहीर लोडशेडींग नसतांना वीजपुरवठा वारंवार बंद होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वीज वितरण विभागाकडून कोणत्याही प्रकारची योग्य माहिती दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासूनच अनेकवेळा वीज गायब होत असल्याने घरगुती दैनंदिन कामे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेतकऱ्यांचे मोटार पंप व्यवस्था तसेच लहान व्यावसायिकांचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात वीज पुरवठा बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पंखे, कुलर, फ्रीज, पाणीपुरवठा यंत्रणा बंद राहत असल्याने महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी आणि ऑनलाईन अभ्यास देखील विस्कळीत होत असल्याचे जाणवत आहे.
शेतकरी वर्गालाही याचा मोठा फटका बसत असून काही भागात पाणीटंचाईची आधीच गंभीर असताना विजेच्या लपंडावामुळे परिस्थिती अधिक बिकट होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्यामागे तांत्रिक बिघाड आहे की अन्य काही कारण, याबाबत महावितरण विभागाने भूमिका मांडणे आवश्यक आहे. वारंवार विजपुरवठा बंद होत असल्याने नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असून संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन नियमित व सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील जनतेकडून मागणी होत आहे.
दरम्यान, महावितरण विभागाने ग्रामीण भागातील वीज यंत्रणेची तातडीने तपासणी करून दोष दूर करावेत. तसेच नागरिकांना वेळोवेळी माहिती देऊन नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी जोर धरत आहे.



