ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरीमध्ये काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

मोदी सरकारविरोधात धडकले 'जनआंदोलन'

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :_ देशातील ढेपाळलेली शिक्षण व्यवस्था, NEET परीक्षा प्रकरणातील प्रचंड गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय याविरोधात आवाज उठवणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुलजी गांधी, खासदार प्रियंकाजी गांधी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधीमंडळ काँग्रेस पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांना करण्यात आलेल्या अन्यायी अटकेच्या निषेधार्थ आज ब्रम्हपुरी शहर पेटून उठले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत, तालुका व शहर काँग्रेस कमिटी, शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने आज ब्रम्हपुरीत अत्यंत शिस्तबद्ध, तरीही तितकेच तीव्र आणि आक्रमक ‘जनआंदोलन’ छेडण्यात आले.

   सकाळी ९ वाजता शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निषेध बाईक रॅली काढण्यात आली. सरकारच्या शिक्षणविरोधी धोरणांचा व हुकूमशाही वृत्तीचा निषेध करत काढण्यात आलेल्या या रॅलीमुळे शहरात केंद्र सरकारविरोधात रोषाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनाला पाठिंबा म्हणून ब्रम्हपुरी शहरातील सर्व शाळा व महाविद्यालये कडकडीत बंद ठेवण्यात आली होती.

    सकाळी ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तिथून भव्य मोर्चा ख्रिस्तानंद चौकाकडे रवाना झाला.

मोर्चा काँग्रेस कार्यालयाजवळ पोहोचल्यानंतर आंदोलकांनी केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतीकात्मक तिरडी काढली. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान व गृहमंत्री अमित शाह यांच्या पुतळ्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलक कॉम्रेड विनोद झोडगे व रवी मैंद यांनी भर रस्त्यात मुंडण करून केंद्र सरकारच्या ताघडधिंगा कारभारावर जोरदार ताशेरे ओढले.

       आंदोलकांचा मोर्चा प्रतीकात्मक प्रेतयात्रा घेऊन ख्रिस्तानंद चौक येथे पोहोचला. तेथे संतप्त कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्री व गृहमंत्र्यांच्या पुतळ्यांना चपलांनी मारहाण करत पुतळ्यांचे दहन केले. यानंतर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून ‘रस्ता रोको’ आंदोलन केले. संपूर्ण परिसरात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

        हे सर्व आंदोलन अत्यंत नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध मार्गाने पार पडत असतानाच, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये या कारणास्तव पोलिसांनी हस्तक्षेप करत १० प्रमुख आंदोलकांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. त्यात स्थानबद्ध करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये कॉम्रेड नेते विनोद झोडगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, नगराध्यक्ष योगेश मिसार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे,काँग्रेसचे शहर अध्यक्ष हितेंद्र राऊत, नगरसेवक जगदीश पिलारे, शिवसेना (उबाठा) नेते नरेंद्र गाडगीलवार, ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जमातीचे कार्याध्यक्ष अमित कन्नाके आणि काँग्रेस कार्यकर्ते मुकुंदा राऊत यांचा समावेश आहे.

            विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नेत्यांचा आवाज दडपू पाहणाऱ्या केंद्र सरकारचा आजच्या आंदोलनातून तीव्र निषेध करण्यात आला. हातात तिरंगा घेऊन आंदोलकांनी आंदोलन केले.

“विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या नेत्यांना अटक करून सरकार आपली हुकूमशाही सिद्ध करत आहे,” अशी टीका यावेळी उपस्थित नेत्यांनी केली. ब्रम्हपुरीतील आजच्या या अभूतपूर्व बंद आणि आंदोलनाने केंद्र सरकारविरोधातील जनतेचा आणि विद्यार्थ्यांचा उद्रेक स्पष्टपणे दाखवून दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये