खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला मोठे यश
चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदारसंघात निवडणूक आचारसंहिता अखेर संपुष्टात

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर, या क्षेत्रातील निवडणूक आचारसंहिता तात्काळ रद्द करण्यात यावी, या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या आग्रही मागणीला मोठे यश आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या उप मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृत पत्र जारी करून या मतदारसंघातील आचारसंहिता संपुष्टात आल्याचे स्पष्ट केले आहे.
नुकतीच महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली होती, ज्यामुळे संबंधित क्षेत्रांमध्ये आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली होती. मात्र, चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली हा मतदारसंघ संपूर्णपणे बिनविरोध झाल्यामुळे येथे प्रत्यक्ष मतदान किंवा इतर कोणतीही निवडणूक प्रक्रिया पार पडणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे आग्रही मागणी केली होती की, निवडणूक बिनविरोध झालेली असतानाही आचारसंहिता पुढे चालू ठेवल्यास विकासकामांना नाहक विलंब होईल आणि सर्वसामान्य जनता अडचणीत येईल. सध्या पावसाळा तोंडावर असल्याने पूर नियंत्रण, रस्ते दुरुस्ती, शेतीविषयक कामे आणि इतर जनहितार्थ स्थानिक विकासकामांना गती देणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले होते.
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीची व जनतेच्या हिताची दखल घेत सामान्य प्रशासन विभागाने (निवडणूक शाखा) ५ जून २०२६ रोजी अधिकृत पत्रक जारी केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ज्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडणूक बिनविरोध होऊन निकाल घोषित झाले आहेत, तेथील आचारसंहिता निकाल जाहीर होताच संपुष्टात आली आहे, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. आचारसंहिता संपुष्टात आल्याच्या या अधिकृत घोषणेमुळे आता चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यांतील प्रशासकीय निर्णय, रखडलेल्या लोककल्याणकारी योजना आणि पावसाळापूर्व कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला असून, विकासकामांचा खोळंबा टळल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.



